सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (08:12 IST)

मुंबईतील भारतीय सिनेमाविषयक राष्ट्रीय संग्रहालय पुन्हा खुले; हा अनमोल ठेवा पहायला मिळेल

भारतीय चित्रपटविषयक राष्ट्रीय संग्रहालय (NMIC), जे कोविड महामारीमुळे मधल्या काळात बंद होते, ते आजपासून पुन्हा लोकांसाठी खुले झाले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरूगन यांनी आज या संग्रहालयाला भेट दिली आणि त्यांच्याच उपस्थितीत पुन्हा एकदा हे संग्रहालय खुले झाले. मुरूगन यांनी या संग्रहालयात ठेवलेल्या सर्व वस्तूंची, साहित्याची बारकाईने पाहणी केली. दोन भव्य इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे. – एक गुलशन महल- ही चित्रपटांचा वारसा सांगणारी देखणी इमारत आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या एक अत्याधुनिक बहुमजली इमारतीत हे संग्रहालय आहे. दक्षिण मुंबईत पेडर रोडवर हे संग्रहालय आहे. फिल्म डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी डॉ मुरूगन यांना या संग्रहालयाची माहिती दिली. सध्या संग्रहालय बंद असल्याने, काही ठिकाणी प्रलंबित असलेली दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे देखील या काळात पूर्ण करण्यात आल्याचे भाकर यांनी सांगितले.
 
एनएमआयसी हे भारतातले चित्रपट विषयक वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते. गुलशन महल वारसा स्थळ असलेल्या इमारतीत आठ विविध सभागृहामध्ये हे संग्रहालय पसरले आहे. भारतीय चित्रपटसृष्टिच्या मूक चित्रपटापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातील चित्रपट सृष्टिचा प्रवास यात दर्शवण्यात आला आहे. तर नव्या इमारतीत अनेक संवादात्मक उपक्रम/प्रदर्शन आहेत. एनएमआयसी मध्ये चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी वापरलेल्या कित्येक दुर्मिळ वस्तू देखील ठेवल्या आहेत. ‘वीरपंड्या कट्टबोम्मन’ चित्रपटात अभिनेता शिवाजी गणेशन यांनी वापरलेले चिलखत, ‘आदीमई पेन्न’ चित्रपटात एम. जी. आर. यांनी वापरलेला लाल कोट देखील या संग्रहालयात आपल्याला बघायला मिळतो.
 
चित्रपटात वापरल्या गेलेल्या वस्तू, दुर्मिळ उपकरणे, पोस्टर्स, महत्वाच्या चित्रपटांच्या चित्रफिती, जाहिरात करणारे बॅनर, साऊंड ट्रॅक, ट्रेलर्स, निगेटिव्ह, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाचे आर्थिक गणित सांगणारी माहिती, असे सगळे या संग्रहालयात अत्यंत सुव्यवस्थितपणे मांडलेले आहे. बालचित्रपट फिल्म स्टुडिओ आणि गांधी आणि सिनेमा हे देखील या संग्रहलयांचे आकर्षण आहे. मे मध्ये, एनएमआयसी च्या परिसरात, इथल्या अत्याधुनिक सभागृहात 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पट महोत्सव- (MIFF) चे आयोजन केले जाणार आहे.