शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (08:24 IST)

नव्या वर्षात नाशिक ते कल्याण या मार्गावर मेमू’लोकलने प्रवास करता येणार!

कल्याण ते नाशिक दरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी म्हणून गेल्या वर्षी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सब अर्बनची मर्यादा वाढविल्यास कल्याण ते कसाराच नाही तर कल्याण ते नाशिक लोकल प्रवास अशी मेमू रेल्वे सेवा सुरू करणं शक्य होईल. ही लोकल सुरू केली तर दळण-वळण वाढून ग्रामीण भागांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असे गोडसे यांनी रेल्वे मंत्र्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे डिसेंबरमध्ये नाशिक-कल्याण दरम्यान मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
सध्या नाशिक ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस सारख्या रेल्वे आहेत. मात्र आता ही लोकल सुरू झाल्यास याचा फायदा व्यावसायिकांसह शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, चाकरमान्यांना देखील होणार आहे. गेल्या लोकसभेदरम्यान, नाशिक-कल्याण मेमू लोकल रेल्वे सेवेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. नाशिक-कल्याण लोकलसाठी खासदार हेमंत गोडसे यांची अनेक वर्षांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने नाशिक-कल्याण दरम्यान लोकल सेवेला मान्यता दिली होती. चेन्नई कारखान्यातून मुंबईतील इमू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) प्रकारची ३५ कोटींची लोकल दीड वर्षापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये दाखलही झाली होती. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, १५ किलोमीटरच्या कसारा घाटात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वर्षभरापासून लोकलची चाचणीच झाली नव्हती. परंतु आता पुढील महिन्यात या मेमू लोकलची चाचणी करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्यास नव्या वर्षात नाशिक ते कल्याण या मार्गावरचा सुखकर होणार आहे.