गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (20:16 IST)

बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

mumbai mahapalika
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
 
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
 
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग ग्लायडर्स, हॉट एअर बलून, खाजगी हेलीकॉप्टर आदींना दि. 8 एप्रिल, 2022 पर्यंत प्रतिबंध करण्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी जारी केले आहे.
 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.