शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई : आपल्या उत्सवाची आणि आनंदाची किंमत आपण मोजतो, असे म्हणत सणांच्या मिरवणुकांतील डीजे, डॉल्बीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोट ठेवले आहे. उत्सव, आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतो, त्याचा परिणामही अनेकांवर होतो, आपले कुठेतरी चुकत आहे याचा विचार करायला लावणा-या गोष्टी घडत असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून त्यामाध्यमातून हे मत मांडले आहे.
 
राज्यात नुकतीच गणपती विसर्जनाची मिरवणूक पार पडली. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी डॉल्बीचा दणदणाट ऐकायला मिळाला. त्याच्या आवाजाने काही जणांचा जीव गेला तर अनेकांना कायमचे बहिरेपण आल्याच्या बातम्या आल्या. या सर्वावर राज ठाकरेंनी एक विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘डीजे, डॉल्बीच्या आवाजांमुळे अनेकांना त्रास झाला.
 
आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचे अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की. पण, गणेश उत्सवात १० दिवस आणि मुख्यत: मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजाच्या कर्कश पातळीमुळे हृदय बंद पडणे आणि मृत्यू येणे किंवा बहिरेपण येणे किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणे हे प्रकार वाढले आहेत. सलग २४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको.