आगामी दिवसात कोरोना लस घेण्याआधी हे वाचा, असे आहे नियोजन
मुंबई महापालिकेने ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सलग ४ दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यात देखील ३ दिवस लसीकरण बंद असणार आहे. ४, ५, ७ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील लसीकरण बंद राहणार आहे. फक्त शुक्रवारी सकाळच्या सत्रात पुण्यात लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान कोरोनावर सध्या तरी कोणतेही औषध जगभरात उपलब्ध नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण हाच उपाय आहे. तसेच, कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे इत्यादी नियमांचे कडक पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला परतवून लावण्यात आणि कोरोनाची तिसरी लाटही मुंबईच्या वेशीवर थोपविण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवर गुरुवारी ४ ते ७ नोव्हेंबर २०२१ असे ४ दिवस लसीकरण बंद असणार आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने ८ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होणार आहे.
पुण्यात गुरुवार ४, शुक्रवार ५ तर रविवारी ७ तारखेला लसीकरण बंद राहणार आहे. शुक्रवारी ६ तारखेला फक्त लसीकरण सकाळच्या सत्रात सुरू करण्यात येणार आहे. दिवाळी सण असल्यामुळे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, या दृष्टीकोनातून पुणे महापालिकाने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.