शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (10:00 IST)

'म्हणून' मुंबईतील लसीकरण प्रक्रिया बंद

अरबी समुद्रात तौत्के नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टींवर १५ ते १६ मे रोजी धडकणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तौत्के चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर धडकणार असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतील लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सर्वच पालिका आपत्ती मदत यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. मुंबईतील समुद्र किनारपट्टीवरील रहिवाशांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
तौत्के वादळासह मुंबईती किनारपट्टींवर सोसाट्याचा वारा आणि पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील लसीकरण १५ आणि १६ मेला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेने ट्विट करत मुंबईतील लसीकरण बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मुंबईतील झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणामध्ये अडथळा आणि नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने लसीकरण केंद्रच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील लसीकरणाविषयी योग्य वेळी माहिती देण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
 
महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारा असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच सर्व कोविड सेंटर, रुग्णालयांजवळील उंच झाडांची छाटणी करण्यात आली आहे. वृक्ष उन्मळून पडल्याने अपघात होऊ नये यासाठी मुंबईतील अनेक वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. मुंबईतील ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देऊन मोबाईल व्हॅन सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.