गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:15 IST)

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बुधवारपासून निपाणी पोलिसांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद केल्या असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 
जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नागरिकास प्रवाशांना प्रवेश देताना योग्य ती खबरदारी घ्या त्याच्या कोरोना तपासणी संबंधित असलेली सर्व ती कागदपत्रे पडताळून मगच कर्नाटकात प्रवेश द्या अशा सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे बुधवारपासून निपाणी सर्कलमधील पोलिसांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यामध्ये आप्पाचीवाडी-म्हाकवे, बेनाडी- सुळकुड, मांगुर- यळगुड, निपाणी मुरगुड या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी निपाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शिवाय रहदारीचे प्रमुख रस्ते बंद केले आहेत. 
 
जिल्हा प्रशासन व राज्य सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत हा बंद होणार आहे. विशेष करून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. ४८ तासांपूर्वी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवासी व नागरिकांची कोरोनाची तपासणी झाली पाहिजे. तशा प्रकारची कागदपत्रे असेल तरच संबंधित प्रवाशी व नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.