रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (21:29 IST)

थर्टी फर्स्टसाठी गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई : वळसे-पाटील

मुंबई : २०२१ वर्ष संपत आले आहे. नव्या वर्षाची चाहूल लागली असून त्याच्या स्वागतासाठी तरुणाई आतूर आहे. तरुण तसेच इतर नागरिकांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
 
यावेळी बोलताना नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांना पार्टी करायची आहे त्यांना पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना आम्ही काही सूचना दिल्या आहेत. जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्याविरोधात कठोर करावाई करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कारवाई करण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करुन गर्दी करु नये, असे आवाहन मी नागरिकांना करतो, असे वळसे पाटील म्हणाले.
 
पुढे बोलताना त्यांनी दोन वर्षांपासूनची कोरोना स्थिती, पोलीस दलाची कामगिरी तसेच आगामी काळातील सुरक्षा आणि सुव्यवस्थेविषयीची तयारी यावरदेखील भाष्य केले. “मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र तसेच देशात वेगळी स्थिती होती. लॉकडाऊन लावण्यात आले. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्राला झाला. यामुळे पोलीस, सरकार यांना खूप काम करावं लागलं. आर्थिक संकट उभं राहिलं. लॉकडाऊन संपल्यानंतर गुन्हेगारी घटनादेखील घडल्या. मात्र आगामी काळात ही गुन्हेगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच राज्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आम्ही क्राईम कॉन्फरन्स बोलवली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अधिकारी येणार आहेत. सामान्य नागरिकांना पोलिसांवर विश्वास वाटला पाहिजे, असं यावेळी सांगण्यात येणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.