मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (07:59 IST)

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी ९०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार

ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी  २१३ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीचे ३१४ आणि आताचे २१३ असे ५२७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे या रुग्णालयाचे काम आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा 
रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. 
ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच याठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी ३१४ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर याजागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त २१३ कोटी रुपयांची गरज होती. आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रक्कमेला मान्यता मिळाली आहे.
जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी ९०० बेडसचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार असून त्यात २०० मेटर्निटी, २०० सुपर स्पेशालिटी बेडस असतील तर उर्वरित ५०० बेडस हे सर्वसाधारण बेडस असणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात दोन स्वतंत्र आयसीयू उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून तिथे युरोलॉजी, अंकोलॉजी, ओंको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्कुलर सेक्शन, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस  अशा सगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबधित आजार तसेच हृदयरोगावर उपचार घेणे शक्य होणार आहे. याशिवाय या रुग्णालयात वैद्यकीय तासिका घेण्यासाठी खास थिएटर, ट्रेनिंग हॉल इतकेच नव्हे तर रुग्णाला एअर लिफ्ट करून आणण्यासाठी हेलिपॅडची सुविधा देखील असणार आहे. तीन बेसमेंट आणि वर दहा मजल्याच्या दोन इमारती याजागी उभारण्यात येणार आहेत.  या दोन्ही इमारतींना जोडण्यासाठी सातव्या मजल्यावर एक पूल देखील असेल. तसेच वजनदार मशिन्स ठेवण्याची सोय या इमारतीच्या बेसमेंट सेक्शनमध्ये करण्यात येईल.
ठाणे सर्वसाधारण रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची आहे. त्यातही ठाणे, पालघर येथील लाखो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे जुने रुग्णालय कमी पडू लागले आहे. त्यामुळे लोकांची वाढती गरज लक्षात घेऊन उभारण्यात येणारे हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय रुग्णासाठी उपयुक्त ठरणार आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह  स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार यांनी या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार पूर्वी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तर अलिकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. श्री. शिंदे यांच्याकडे काही काळ आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार असताना त्यांनी या प्रस्तावाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणारा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.