गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (07:57 IST)

मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द

राज्य शासनाने हमी दिल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द करण्यात आली आहे. शासन मुंबईसाठी मागणी केल्यानुसार जरी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करीत असेल तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका जल अभियंता खात्याचे प्रमुख पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील एकूण पाणीसाठा 45 टक्क्यांवर घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाष्पीभवन, जलवाहिन्या फुटणे, गळती, पाणी चोरी आदींमुळे पाणीसाठा 5 टक्के कमी झाला आहे. त्यातच पावसाचा लहरीपणा पाहता मुंबई महापालिकेने नियमित पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी दैनंदिन पाणी पुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्याबाबत हमी देत विधिमंडळ अधिवेशनात मुंबईकरांवरील पाणी संकट टळल्याचे जाहीर केले. आता मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळले असून त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor