शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (09:39 IST)

मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् शासनाने ताब्यात घेतले

कोरोना रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् शासनाने ताब्यात घेतले आहेत. काही ठिकाणी क्षत्रीय रुग्णालय उभारून सुविधा निर्माण केल्या आहेत. यासर्व सुविधांमध्ये रुग्णसेवेवर आता अधिक लक्ष देतानाच रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
 
मुंबईतील महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर मुख्य मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या आता त्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे. शासनाने खासगी रुग्णालयातील ८० बेडस् ताब्यात घेतले आहेत. शिवाय काही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांची जबाबदारी सोपविल्याने कामकाजात सुसुत्रता येतानाच रुग्णांना बेडस् देखील मिळत आहेत. महापालिकेने मुंबईतील ३५ मोठ्या रुग्णालयातील ८० टक्के बेडस् ताब्यात घेऊन सामान्यांना ते उपलब्ध करून दिले. देशात मोकळ्या मैदानावर रुग्णालये उभारण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे. या अशा सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची बेडस् साठी होणारी गैरसोय टळली आहे.
 
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा जीवनावश्यक औषधांचा साठा देखील महापालिकडे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आता सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत त्याचा वापर मात्र नियोजनबद्ध पद्धतीने झाला पाहिजे. शासनाने जंबो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामध्ये चांगली सेवा मिळते याबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा जेणेकरून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा ओढा कमी होईल आणि रुग्णालयांवरचा ताण देखील कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
ज्या खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेडस् ताब्यात घेतले आहेत अशा रुग्णालयांनी सध्या किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत किती बेडस् रिक्त आहेत याची यादी बेडस् च्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णवाहिकांना देखील मार्गदर्शन करावे म्हणजे कुठल्या रुग्णालयात बेडस् रिक्त आहेत याची त्यांना माहिती मिळू शकेल. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका आहेत काही खासगी संस्थांनी देखील रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करावी जेणेकरून त्या माध्यमातून नागरिकांना सेवा मिळू शकेल.
 
मुंबईतील जी छोटी खासगी रुग्णालये आहेत तेथे नॉन कोविड रुग्णांना सेवा मिळेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधांची निर्मिती चांगली झाली आहे मात्र त्या विनावापर पडून राहिल्या असे होता कामा नये. कोरोना विरुद्ध लढा आता अंतिम टप्प्यात  आला असे समजून जिंकण्यासाठी पावले उचलावित आणि मुंबई कोरोनामुक्त होईल, असे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.