मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 जून 2021 (09:00 IST)

मुंबईत केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एनसीबीचा बेकरीवर छापा

ड्रग्सची विविध माध्यमातून तस्करी होत असतानाच आज चक्क बेकरीच्या प्रोडक्ट्समधून विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीजमधून ड्रग्स लपवून सप्लाय करण्यात येत होते. मात्र, याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तिथे छापा टाकण्यात आला आहे.
 
लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होती. त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून सप्लाय होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकला.
 
घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 160 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनसीबीने एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.
 
सुशांतच्या मृत्यू नंतर ड्रग्ज तस्करांवर कारवाई
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन आता वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या मृत्यू नंतर समोर आलेला ड्रग्ज अँगल आणि त्यानंतर एनसीबीची सुरू असलेली कारवाई ही अद्यापही सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कारवाया करत तस्करांना गजाआड केलं आहे.