मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (21:24 IST)

शेअर बाजारात तोटा झाला अन् राष्ट्रीय खेळाडू बनला गुन्हेगार .....

मुंबई : मुंबईतील एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूने शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली. त्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले. परंतु शेअर बाजारात तोटा होऊ लागला. हा तोटा १६ लाखांपर्यंत गेला. मग पैसे मिळवण्यासाठी त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली. मुंबईतील एका 60 वर्षीय महिलेची सोनसाखळी लुटल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
 
शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बेसबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू आकाश धुमाळ याने हा प्रकार केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
गोरेगाव येथील प्रेसेज डिसिजा या 60 वर्षीय महिलेने भगुर नगर पोलीस ठाण्यात सोन्याची सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार दिली. गोरेगावमधील इंदिरा नगर भागातून रविवारी दुपारी 12 वाजता 60 हजार रुपये किंमतीची त्यांची सोनसाखळी लांबवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात 25 वर्षीय आकाश धुमाळ याने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. तो बेसबॉलमधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.
 
शेअर बाजारात 16 लाखांचा तोटा
आकाश धुमाळ याची घरची परिस्थिती चांगली नाही. तो एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली. त्यासाठी लोकांकडून पैसे घेतले. हे कर्ज 16 लाखांपर्यंत गेले. त्याला शेअर बाजारात तोटा झाला. लोक पैशांची मागणी करु लागले. त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरी केली. तो गोरेगावमधील भगतसिंग नगर येथील रहिवासी आहे. पोलिसांना आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यात आकाश धुमाळ दिसून आला. पोलिसांनी त्याच्या घरून त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.