गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (20:23 IST)

पुढील ३० दिवसात राज्यात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडणार?, अंजली दमानियांचा दावा

जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात या घडामोडी घडतील असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
 
अंजली दमानिया म्हणाल्या की, येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्ष भाजपा फोडेल त्यामुळे विरोधी पक्षच उरणार नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, लढावे लागेल. जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत अशी माझ्या मनात शंका आहे. जरांगेबद्दल म्हटले जाते की, ते एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून करतात तसं मीदेखील ऐकलं.परंतु मला तसं वाटत नाही. आज लढायचे झाले, तर कुणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो. पूर्वी मी खडसेंविरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले तेव्हा मी फडणवीसांसाठी लढतेय असं लोक म्हणायचे. पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
 
मनोज जरांगेंचे कौतुकअन्‌‍‍ दिला सल्लाही
दरम्यान, जो कोणी लढतो त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. पण जरांगेंनी इतका मोठा लढा उभा केलाय त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. राजकीय वर्तुळात जी चर्चा होते तीच मी ऐकली आहे. मराठा आरक्षणासाठी ती व्यक्ती लढा देत असेल तर त्याचे कौतुक करायला हवे. एवढा मोठा लढा उभा करणे ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही परंतु जरांगे पाटलांवर ज्याप्रकारे पुष्पवृष्टी केली जाते. अडीचेशे जेसीबी लावून फुलं उधळली जातात ते जरांगेनीही स्वत:हून थांबवायला हवे. आपण आपल्या लढ्याला तत्वे ठेवली तर खरं कोण आणि खोटं कोण हे लोकांनाही कळते असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.