शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (16:37 IST)

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील जनआशीर्वाद यात्रेसाठी ठाण्यात दाखल

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील जनआशीर्वाद यात्रेसाठी ठाण्यात दाखल झाले. यावेळी कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी बँड आणला होता. दरम्यान, कपिल पाटील यांचं डॉनच्या गाण्यावर स्वागत करण्यात आलं.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, त्याचबरोबर आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत. या यात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते, तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.
 
कपिल पाटील उद्या रायगड दौऱ्यावर असणार आहेत. रायगड जिल्ह्यातील जनआशीर्वाद यात्रेला १७ ऑगस्ट रोजी अलिबाग येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम ते सकाळी ८.३० वाजता अलिबाग कोविड रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर अलिबाग विश्रामगृह येथे सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद आणि सकाळी १० वाजता लाभार्थी व मच्छिमारांची भेट, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन, भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा, चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा,आणि त्यानंतर ते पेणकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी १२.४५ वाजता पेण येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट, त्यानंतर पनवेलकडे रवाना होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी सांगितलं.