गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (07:59 IST)

महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईत ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालय, वांद्रे कुर्ला संकुल जम्बो सुविधा केंद्र, नेस्को गोरेगांव जम्बो सुविधा केंद्र, मुलुंड जम्बो सुविधा केंद्र आणि दहीसर जम्बो सुविधा केंद्र या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही लसीकरण केंद्रांवर दिवसभरात ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले.
 
अनेक लसीकरण केंद्रांवर महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरणासाठी येणा-या महिलांचे गुलाबाच्या फुलांसोबतच चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
 
मुंबईत सध्या ‘कोविड – १९’ विषयक लसीकरणाचा तिसरा टप्पा प्रभावीपणे सुरु आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरण केंद्रांवर कोविडची लस घेण्यासाठी येणा-या महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये, १ हजार ९८२ महिलांचे लसीकरण, गोरेगांव परिसरातील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात १ हजार ९३२ महिलांचे लसीकरण, सेव्हन हिल्स रुग्णालयात १ हजार ९०८ महिलांचे लसीकरण, दहीसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये १ हजार ८५२ महिलांचे लसीकरण तर मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये ४१८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. एकूण ५ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.