शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 एप्रिल 2020 (09:41 IST)

वाशी मार्केटमध्ये २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; अन्न, नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या आणि त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत एपीएमसी मार्केट वाशी येथुन 2 कोटी रुपयांचा कडधान्यांचा साठा जप्त केला असून राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असून राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सात वर्षाची कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते.
 
एपीएमसी मार्केट मध्ये करण्यात आलेल्या या तपासणीमध्ये बाजार व गोदामांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ताज ॲग्रो कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड टी. टी. सी. इंडिया एरिया पावणे नवी मुंबई व वसवाल राधेशाम भंडारी टी. टी. सी. इंडिया एरिया पावने नवी मुंबई या आयातदारांनी आयात केलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमानुसार उद्घोषणा नमूद केलेल्या नसल्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 च्या कलम 18-1/36-1व त्याअंतर्गत वैधमापन शास्त्र आवेष्टित नियम 2011 मधील नियम 6-1,6-2 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या कारवाईत एकूण दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई कोकण विभागाचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र डॉ.खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र सहायक नियंत्रक सी.सा.कदम, निरीक्षक सु.रो कुटे, रा. गु सपकाळ यांनी केली आहे.