बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (13:49 IST)

बिहारमधून सांगलीत तस्करी होणाऱ्या 59 लहान मुलांची केली सुटका

बिहारच्या 59 मुलांची तस्करीच्या जाळ्यातून रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी कलम 470 अंतर्गत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
 
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील असलेल्या 59 मुलांना सांगलीतल्या मदरशात नेण्यात येत होतं. हे मानवी तस्करीचं प्रकरण असल्याचं कळल्यावर भुसावळ आणि मनमाड स्थानकांवरून पोलिसांनी त्यांची सुटका केली.
 
या मुलांना आता जळगाव आणि नाशिक येथील बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले असून, त्यांची काळजी घेण्यात येत आहे. कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर संबंधित बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी दिली.
 
दानापूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे नंबर 01040 यामध्ये एका एनजीओने तस्करी होत असल्याची माहिती दिली. या माहितीवरून आरपीएफ आणि जीआरपी या पोलिसांच्या संयुक्त टीमने धडक कारवाई केली.
 
यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयिताला शिताफीने पकडण्यात आले.
 
सदर एक्सप्रेसमध्ये पोलिसांची तपासणी सुरूच होती. मनमाडपर्यंत पुढील तपासणी दरम्यान शोध मोहीममध्ये आणखी 30 मुले आणि 4 संशयित तस्करांची ओळख पटली. त्यांना मनमाड स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले आहे.
 
तर भुसावळमधून सुटका केलेल्या 29 मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मनमाड येथील 30 मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
 
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये सदर बालकांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
 
या मुलांची तस्करी करणाऱ्या पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
सुटका केलेल्या या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटवल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.