बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (17:19 IST)

विम्याच्या पैशांसाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला, मृतदेह चोरून आणला, पण...

Death
बरीच वर्ष धान्याचा व्यापार करणारा व्यापारी कर्जबाजारी झाला होता. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली. आपल्या मृत्यूचा बनाव रचून विम्याचा दावा केल्यास आपली या कर्जातून सुटका होईल असं त्याला वाटलं.
 
त्यासाठी त्याने एक मृतदेह चोरून आणला. पण जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
 
केतमल्लू व्यंकटेश्वर राव उर्फ पुसैया असं या व्यापाऱ्याचं नाव असून आंध्रप्रदेशात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
 
पण नेमकं हे प्रकरण काय आहे? रंगमपेठ पोलिसांनी या प्रकरणाची उकल कशी केली?
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीला पहाटे वीरमपालम गावातील केतमल्लू गंगाराव नावाच्या शेतकऱ्याच्या शेताजवळ एक मृतदेह आढळून आला.
 
ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह पडून होता. त्या मृतदेहाजवळ सापडलेले शूज आणि इतर वस्तूंच्या आधारे या व्यक्तीची केतमल्लू व्यंकटेश्वर राव उर्फ पुसैया अशी ओळख पटवण्यात आली.
 
प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला.
 
स्थानिक पोलिसांनी सीआरपीसी 174 अन्वये क्रमांक 36/2024 प्रमाणे गुन्हा नोंद केला.
 
दुसरीकडे, पुसैयाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचीही व्यवस्था त्याच्या कुटुंबीयांनी केली. त्याची पत्नी आणि मुलं शोक करत असताना अचानक पुसैयाचा फोन आला. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
 
पोलिसांनी सांगितलं की, पुसैयाने फोनवार सांगितलं की, तो जिवंत असून, काही लोकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला पिडिंगोई, राजमहेंद्रवरम गावाजवळ फेकण्यात आलं.
 
मग तो मृतदेह कोणाचा होता?
पोलिसांनी सांगितलं की, पुसैयाने स्वत:ला मृत दाखविण्यासाठी त्या मृतदेहाचा वापर केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी पुसैयाने बोम्मूर येथील काही लोकांशी संपर्क साधून एका मृतदेहाची सोय केली. आणि मृतदेह कोणी ओळखू शकणार नाही अशा प्रकारे अर्धवट जाळण्यात आला.
 
याच दरम्यान ओएनजीसीचे अभियंता नेल्ली विजयराजू (53) यांचं ओल्ड बोम्मूर येथे निधन झालं होतं त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे शव ओल्ड बोम्मूरच्या स्मशानभूमीत पुरलं होतं.
 
25 तारखेला वंदे श्रीनू आणि चीरा चिन्नी नावाच्या तरुणांनी विजयराजू यांचा मृतदेह शवपेटीतून बाहेर काढला.
 
पुसैयाच्या म्हणण्यानुसार, 26 तारखेला पहाटे मृतदेह वीरमपालम येथे नेण्यात आला आणि शेताच्या मध्यभागी पेट्रोल टाकून जाळण्यात आला.
 
मृतदेहाशेजारी पुसैयाचे बूट आणि फोन टाकून सगळेजण गायब झाले.
 
तिथं मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गावकऱ्यांनी हा मृतदेह पुसैयाचा असल्याचं समजून स्थानिक अधिकाऱ्यांना तशी माहिती दिली.
 
दुसरीकडे, पुसैयाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या लोकांनी वीरमपालममध्ये पुसैयाच्या घराजवळ घडणाऱ्या घडामोडी पुसैयाला सांगितल्या.
 
आपली पत्नी धायमोकलून रडत असल्याचं समजताच पुसैयाने पिडिंगोया गावातील तलारी सुब्बाराव यांना तिच्या सांत्वनासाठी पाठवलं.
 
तलारी सुब्बाराव यांनी पुसैया जिवंत असल्याचं सांगून काही अनोळखी तरुणांनी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली.
 
पितळ उघडं पडलं
पुसैयाने विम्याच्या पैशासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला, शिवाय पुरलेल्या मृतदेहाची चोरी केली.
 
पण पुसैयाने पोलिसांना सांगितलं होतं की, अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला करून त्याचं अपहरण केलं आणि त्याला दुखापत झाली. मात्र तशी दुखापत दिसत नसल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पुसैयाची चौकशी केली.
 
शेवटी पुसैयाचं पितळ उघडं पडलं. त्याला आणि इतर तीन आरोपींना 30 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आली.
 
सीआय शिवगणेश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील कारवाई केली जाईल.