जेटली यांना किडनी विकार, प्रत्यारोपणाचा सल्ला
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सध्या किडनीच्या विकाराचा त्रास सुरू झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आराम करण्याची सूचना केली आहे. यामुळे ते सध्या संसदेच्या कामकाजापासून दूर आहेत. ते नूतन राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीसाठीही हजर राहिले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
भाजपाचे सरकार आल्यानंतर जेटली यांच्यावर पोटाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली होती. जेटली यांना दीर्घकाळापासून मधुमेह असून, वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही शस्त्रक्रिया झाली होती. ती शस्त्रक्रिया मॅक्स हॉस्पिटलमध्ये झाली. पण काही गुंतागुंत झाल्याने त्यांना नंतर एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी जेटली यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. अरुण जेटली यांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले नाही. पण, संसर्गापासून वाचण्यासाठी सार्वजनिक बैठकांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.