केजरीवाल यांचे माफीनामा सत्र सुरुच
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली. याशिवाय त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा मुलगा अमित यांचीही माफी मागितली. गडकरी यांनी केजरीवालांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. मात्र आता केजरीवालांनी माफीनामा सादर केल्याने, गडकरींनी हा खटला मागे घेतला आहे. गडकरी आणि केजरीवाल यांनी पटियाला कोर्टात संयुक्त अर्ज दाखल करत खटला मागे घेण्याची विनंती केली. माफीनामा स्वीकारत गडकरींनी खटला मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी 31 जानेवारी 2014 रोजी देशातील 20 सर्वात भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत नितीन गडकरी यांचं नाव होतं. मात्र गडकरींनी केजरीवालांना आव्हान देत, पुरावे द्या अन्यथा माफी मागा, तसं न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जा, असा इशारा दिला होता. केजरीवालांनी माफी न मागितल्याने, गडकरींनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.