बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (09:56 IST)

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयात आग लागली, 4 मुलांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या हृदयद्रावक घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्या वॉर्डात आग लागली तेथे दोन डझनहून अधिक मुलांना दाखल केले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे  12 बंब वेळीच पोहोचल्याने त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग हेही रुग्णालयात पोहोचले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटलमधील मुलांच्या वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागलेल्या वॉर्डात दोन डझनहून अधिक मुलांना दाखल करण्यात आले होते. या आगीत काही मुले जखमी झाली आहेत. उपचारादरम्यान तीन मुलांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग हेही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले की, आग लागलेल्या तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये 40 मुलांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 4 मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. उर्वरित 36 मुलांना सुरक्षितपणे अन्य वॉर्डात हलवण्यात आले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक मृताच्या पालकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची रक्कम भरपाई म्हणून दिली जाईल.
 
या घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयाच्या चाईल्ड वॉर्डमध्ये आगीची घटना दुःखद आहे. बचावकार्य जलद होते. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एसीएस सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान हे तपास करतील. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 तत्पूर्वी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या 12 बंबांनी आग आटोक्यात आणली आहे. तर दुसरीकडे आपले काळजाचे तुकडे गमावल्यामुळे  कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांची अवस्था बिकट असल्याचे सांगितले जात आहे.