कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालच्या सुप्रीम कोर्टाच्या पीठाने हा आदेश दिलाय.
हा टास्क फोर्स देशभरातल्या विविध राज्यांमधली ऑक्सिजन उपलब्धता, पुरवठा आणि वितरणाची पाहणी करून कुठे किती ऑक्सिजनची वा वितरणाची गरज आहे, याविषयीच्या सूचना देईल. यासोबतच कोव्हिड -19 वरच्या उपचारांमध्ये लागणाऱ्या औषधांच्या योग्य उपलब्धतेसाठीच्या सूचनाही हा टास्क फोर्स देईल.
12 सदस्यांच्या या राष्ट्रीय टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आणि डॉक्टर्स यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये केंद्र सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरीही असतील.
या टास्क फोर्समध्ये मुंबईतल्या हिंदुजा आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलचे कन्सलटंट चेस्ट फिजीशियन डॉ. झरीर उदवाडिया आणि मुंबईतल्या मुलुंडमधल्या फोर्टिस हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित यांचाही समावेश आहे.
"कोरोनाच्या या जागतिक साथीदरम्यान सार्वजनिक आरोग्यविषयक पावलं उचलण्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि त्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान पुरवण्यासाठी हा टास्क फोर्स तयार करण्यात येत असून या टास्क फोर्ससोबत देशभरातले आघाडीचे तज्ज्ञ सदस्य आणि सहकारी म्हणून जोडले जाण्याची अपेक्षा आहे," असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
हा टास्क फोर्स केंद्र आणि कोर्टाकडे आपले रिपोर्ट्स सादर करेल.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशभरातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णांचा जीव गेलाय.
महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दक्षिण भारतातून ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजन आणला गेला होता. त्यानंतर थेट एअरलिफ्ट करून म्हणजे टँकरची विमानाद्वारे वाहतूक करून अनेक राज्यांत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय.