सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (20:21 IST)

कोरोना लस : स्पुटनिक-V लशीची पहिली बॅच भारतात दाखल

भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना रशियाच्या स्पुटनिक- V लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच भारतात दाखल झााली आहे. हैदराबादमध्ये ही पहिली बॅच दाखल झाली आहे.
 
यासंदर्भात स्पुटनिक V ने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे, "स्पुटनिक V लसीची पहिली खेप हैदराबादला पोहोचली आहे. याच दिवशी भारताने सर्व प्रौढांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियानही सुरू केलं आहे. आपण एकत्रितपणे या जागतिक साथीला पराभूत करूया. एकत्र आल्याने आपली शक्ती वाढणार आहे."
 
यावेळी रशियाचे भारतातले राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले, "रशिया आणि भारत कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी हे पाऊल दुसऱ्या भयंकर लाटेला शमवण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे."
 
ते पुढे म्हणाले, "स्पुटनिक V जगातल्या इतर सर्व लशींमध्ये सर्वात प्रभावी आहे आणि ही लस कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक असेल. लवकरच स्थानिक पातळीवर या लसीचं उत्पादन सुरू होईल आणि हळूहळू दरवर्षी 85 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना आहे."
स्पुटनिक V भारतात आल्याने आता कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी भारताकडे 3 लशी आहेत.
 
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक V या तीन लसी आता भारतीयांना मिळणार आहे.