शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (19:06 IST)

Exit Poll 2021 : भाजप, तृणमूल काँग्रेस की काँग्रेस कोण ठरणार वरचढ

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. यासाठीचे एक्झिट पोल्स आज जाहीर होतील.
 
पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. एकूण आठ टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडलंय. पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यापैकी कोण वरचढ ठरण्याचा अंदाज आहे, हे एक्झिट पोल्समधून समजेल.
 
निवडणूक होत असलेले पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्य म्हणून ओळखले जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे.
 
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिथलं सरकार कोसळलं.
 
पण पश्चिम बंगालमधली लढत ही सगळ्यात लक्षवेधी ठरण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
भाजपने या राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं केलंय. तृणमूलचे अनेक नेतेही पक्ष बदलत भाजपमध्ये दाखल झाल्याने सत्ताधारी पक्षासमोरची आव्हानं वाढली आहेत.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या छायेखाली झालेल्या प्रचारसभा, आपल्यावर हल्ला झाल्याचा ममता बॅनर्जींनी केलेला दावा आणि नरेंद्र मोदींनी ममतांना प्रचारसभेमध्ये 'दीदी ओ दीदी' म्हणण्यावरून झालेला वाद, यामुळे ही निवडणूक गाजली.
 
निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना निवडणूक आयोगाने कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा आणि रॅलीजवर बंदी घातली होती.
 
तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक (AIADMK) आणि विरोधी द्रमुक पक्ष (DMK) आमनेसामने आहेत. इथे एकाच टप्प्यात संपूर्ण मतदान झालं.
 
तर केरळमध्येही 1, आसाममध्ये 3, पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात मतदान पार पडलं.
 
आसाममधल्या 126, केरळमधील 140, तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294 तर पुद्दुचेरीमधल्या 30 जागांसाठी या निवडणुकांमध्ये मतदान झालं.
 
या पाचही राज्यांची मतमोजणी 2 मे रोजी होऊन निकाल लागतील.