सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (21:49 IST)

दिल्लीत बगिचाच्या हिरवळीवर उभारलं तात्पुरतं स्मशान

मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीमध्ये स्मशानं कमी पडत असल्याने आता मोकळ्या जागांवर तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत.
 
स्मशानांचा तुटवडा भासू लागल्याने कुटुंबांना त्यांच्या जिवलगावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागत आहे. म्हणूनच आता दहनांसाठीच्या जागांची वाढती गरज पाहत दिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत.
 
राजधानी दिल्लीतल्या सराई काले खान स्मशानभूमीमध्ये 27 नवीन चौथरे बांधण्यात आले आहेत. तर शेजारच्याच बागेमध्ये आणखीन 80 चौथरे बांधण्यात येत आहेत. यासोबतच अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदीच्या काठावजवळही महापालिकेचे अधिकारी जागा शोधत आहेत.
 
देशभरातल्या स्मशानांमधले कर्मचारी रात्रंदिवस काम करतायत. मृतांच्या नातेवाईकांनाही या दहनविधींसाठी, चिता रचण्यासाठी मदत करावी लागतेय.
 
या स्मशानभूमीत दररोज फक्त 22 जणांवर अंत्यसंस्कार करणं शक्य असलं तरी आता आपण पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करत असल्याचं एका कर्मचाऱ्याने द हिंदू वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं.
 
पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर स्मशानभूमीच्या पार्किंग लॉटमध्ये 20 नवीन चौथरे उभारण्यात आले आहेत. आपल्याकडे येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढल्याने हे चौथरे बांधावे लागले, तरीही इथे 3 ते 4 तासांचं वेटिंग असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला सांगितलं.
 
इतर स्मशानभूमींमधली परिस्थितीही अशीच बिकट आहे.
 
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतल्या 2 हॉस्पिटल्समधल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने मृत्यू झाला. शहरात अॅम्ब्युलन्सेस कमी पडतायत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला, तरी रुग्णाला तिथपर्यंत नेणं कुटुंबियांना कठीण जातंय. बेडची वाट पाहत काहींचा मृत्यू झालाय.
 
ऑक्सिजन सिलेंडर्स, जीवनावश्यक औषधं किंवा ICU बेड मिळवून देण्यासाठी मदत मागणाऱ्या पोस्टने सोशल मीडिया भरलेला आहे. कोरोनासाठीच्या चाचण्या करणाऱ्या लॅब्सवरही वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आलेला आहे.
 
भारतात रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा आणखी मोठा?
कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मरण पावणाऱ्यांचा भारतातला आकडा दिवसेंदिवस वाढतोय. एकट्या दिल्लीत सोमवारी (26 एप्रिल) 380 मृत्यूंची नोंद झाली.
 
वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन, ICU बेड्स आणि जीवनावश्यक औषधांचा तुटवडा भासतोय.
 
सोमवारी भारतामध्ये 3 लाख 52 हजार 991 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. हा आकडा मंगळवारी काहीसा कमी म्हणजे 3 लाख 23 हजार 144 होता. भारतामध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 76 लाखांपेक्षा जास्त असून 1 लाख 92 हजार मृत्यू झालेले आहेत. पण रुग्ण आणि मृत्यूंचा खरा आकडा बराच मोठा असण्याचा अंदाज आहे.
 
गेल्या आठवड्याभरात दिल्लीत झालेल्या 1,150 मृत्यूंचा समावेश दिल्लीतल्या कोव्हिड मृत्यूसंख्येमध्ये करण्यात आला नसल्याचं NDTV वृत्तवाहिनीने केलेल्या तपासात आढळलं. देशभरातल्या इतर तपासांमध्येही अशाच प्रकारे रुग्ण आणि मृत्यूंची कमी नोंदणी होत असल्याचं उघडकीला आलंय.