शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:44 IST)

त्रिपुरात्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात

election result
ईशान्येकडील तीन राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज (2 मार्च) सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.
 
या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. या निवडणुकीसाठीचं मतदान त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी, तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारी रोजी झालं होतं.
 
कुठे कुणाचं सरकार?
वरील तिन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत सहभागी आहे.
 
मेघालयात 2018 साली भाजपने नॅशनल पीपल्स पार्टीसोबत सत्ता स्थापन केली होती. तर, नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने भाजपच्या सोबत मिळून सत्ता स्थापने केली आहे.
 
नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा सदस्य पक्ष आहे.
 
त्याशिवाय, त्रिपुरामध्येही भाजपचंच सरकार आहे.
 
त्रिपुरा
त्रिपुरामध्ये विधानसभेचे एकूण 60 मतदारसंघ आहेत. भाजपचे डॉ. माणिक साहा येथील विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 2018 च्या निवडणुकीत NDA ने बहुमताचा जादूई आकडा पार करत 36 जागांवर विजय मिळवला होता.
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्ष त्यावेळी केवळ 16 जागा जिंकू शकली होता. तर काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती.
 
2023 च्या निवडणुकीत भाजप आपला गड राखण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी त्यांची लढत डावे आणि काँग्रेस आघाडीसोबत आहे.
 
डाव्या पक्षांनी या निवडणुकीत 43 जागा लढवल्या तर काँग्रेसने 13 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवा, एका जागेवर अपक्ष उमेदवाराला आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेला तृणमूल काँग्रेस पक्षसुद्धा त्रिपुरा विधानसभा निवडणूक लढवत आहे.
 
नागालँड
नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचं सरकार आहे. नेफियू रियो सध्या नागालँडचे मुख्यमंत्री आहेत. हा पक्ष 2017 साली तत्कालीन सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंटपासून फुटून बनला होता.
 
2018 मध्ये त्यांनी NDA सोबत हातमिळवणी करून निवडणूक लढवली आणि जिंकली.
 
त्यावेळी NDA ला 32 जागा मिळाल्या. तर नागा पीपल्स फ्रंटला 27 जागांवर विजय मिळावता आला होता.
 
यंदाच्या निवडणुकीत NDPP 40 तर भाजप 20 जागा लढवत आहे.
 
मेघालय
मेघालयातील 60 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं.
 
या राज्यात काँग्रेस आपलं अस्तित्व राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर भाजप आपल्या डबल इंजीन सरकारच्या फॉर्म्युल्यावरच इथे काम करताना दिसते.
 
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानेही यंदाच्या वेळी निवडणुकीत सहभाग नोंदवला. दुसऱ्या बाजूला नॅशनल पीपर्स पार्टी (NPP) आणि युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी (यूडीपी) सारखे राजकीय पक्षही सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
मेघालयात सध्या नॅशनल पीपल्स पार्टीचे कोनराड संगमा मुख्यमंत्रिमपदावर आहेत. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 59 पैकी 21 जागांवर विजय मिळाला होता. तर नॅशनल पीपल्स पार्टीने 20 जागा जिंकल्या आणि भाजपला केवळ 2 जागा प्राप्त झाल्या.
 
2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 28.5 टक्के मते मिळाली. तर नॅशनल पीपल्स पार्टीला 20. टक्के मते मिळाली होती.
Published By -Smita Joshi