शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:35 IST)

दिल्लीत मार्क्‍सवाद्यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा

केरळात मार्क्‍सवाद्यांनी सरकार मार्फतच राजकीय हिंसाचार माजवला आहे त्यातून संघ आणि भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष केले जात आहे असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने केरळात जनरक्षा यात्रा काढली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मार्क्‍सवाद्यांनी आज दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की संघ आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केरळात हिंसाचार माजवला आहे.
 
त्यांनी हेच काम चालू ठेवले तर त्यांना राज्यात एक आमदारही निवडून आणणे कठीण होईल. राजकीय हिंसाचाराचा आधार घेतच संघाने आणि भाजपने देशात आपले बस्तान बसवले आहे असा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पार्टीवर भ्रष्टाचाराचाही आरोप त्यांनी केला. आपल्या मुलावरच भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना केरळातील जनसुरक्षा यात्रा अर्धवट सोडून दिल्लीत पळ काढावा लागला होता असे ते म्हणाले. देशाच्या राजकारणातून लाल बावटा नाहींसा करू असे भाजप नेते म्हणत आहेत पण हा त्यांचा भ्रम आहे. याच लालबावट्याने फॅसिस्ट शक्तींचा पराभव केल्याचा इतिहास आहे तो त्यांनी विसरू नये असे ते म्हणाले. केरळात भाजप व संघाने राजकीय हिंसाचार थांबवला नाही तर त्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असेही येचुरी म्हणाले.