शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (19:39 IST)

दलाई लामांचा व्हीडिओ व्हायरल, लोकांच्या संतापानंतर मागितली माफी

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली आहे.
दलाई लामा तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर भारतात राहत आहेत. दलाई लामांशी संबंधित एक व्हीडिओ कालपासून (9 एप्रिल) सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
त्यात दलाई लामा अल्पवयीन मुलाच्या ओठांचं चुंबन घेताना दिसतायेत. या अल्पवयीन मुलाच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर दलाई लामा त्यांची जीभ चाटण्यास सांगताना दिसतायेत.
 
रविवारी (9 एप्रिल) हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दलाई लामा यांच्यावर टीका सुरू झाली.
 
सोशल मीडियावर काही युजर्सनी या प्रकाराचा निषेध नोंदवला. लोकांचा वाढता संताप आणि नाराजी लक्षात घेऊन दलाई लामा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांची माफी मागितली.
 
दलाई लामा यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलंय की, “एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. हा व्हीडिओ नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातील आहे, ज्यात एक मुलगा दलाई लामांना सांगतोय की, मी तुम्हाला मिठी मारू शकतो का? जर त्यांच्या शब्दांनी मुलगा आणि त्याचं कुटुंब, तसंच जगभरातील मित्रांना वेदना झाल्या असतील तर दलाई लामा माफी मागू इच्छित आहेत. त्यांना या घटनेचं वाईट वाटतंय. आपले धर्मगुरू त्यांना भेटणाऱ्या लोकांना कायमच अशाच हलक्याफुलक्या पद्धतीने चिडवत असतात. सार्वजनिक ठिकाणीही आणि कॅमेऱ्यासमोरही. त्यांना या घटनेमुळे खेद झालाय.”
 
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी दलाई लामांचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली.
मेघनाद नामक युजरनं लिहिलंय की, “दलाई लामांचा व्हीडिओ सिद्ध करतं की, त्यांचं डोकं फिरलंय. त्यामुळे त्यांनी निवृत्त होऊन एखाद्या तरुणाला जबाबदारी दिली पाहिजे. तुम्ही राजकीय नेते असा किंवा धार्मिक नेते... तुम्हाला निवृत्त होणं शिकलं पाहिजे. घाणेरडं कृत्य.”
 
विद्या कृष्णन यांनी लिहिलंय की, “हा मुलगा आयुष्यभर भयभीत होऊन राहू शकतो आणि ते पश्चाताप व्यक्त करत आहेत.”
 
“हेही जाणून घ्या की, या मुलासोबत दलाई लामांनी जे केलं ते छेडणं नाहीय, तर छळवणूक आहे.”
 
राफेल गोल्डस्टोन लिहितात की, “दलाई लामांचा अल्पवयीन मुलाचं चुंबन घेतानाचा घाणेरडा व्हीडिओ समोर आलाय. ते त्या मुलाला जीभ चुपायला सांगतायेत.”
 
नेटली डेनिस लिहितात की, “हे अत्यंत धक्कादायक दृश्य आहे. दलाई लामा एखा भारतीय मुलासोबत असा व्यवाहर करताना कॅमेऱ्यात पकडले गेलेत. तुम्ही त्यांची देहबोली पाहू शकता.”
 
वादग्रस्त विधानांसाठी यापूर्वीही मागितलेली माफी
दलाई लामांनी यापूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी माफीही मागितली होती.
 
बीबीसीसोबत एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, जर कुणी महिला दलाई लामा बनत असेल, ती आकर्षक असणं आवश्यक आहे.
 
मात्र, त्यानंतर दलाई लामांच्या कार्यालयानं माफी मागत म्हटलं की, ते मस्करी करत होते.
 
“आपल्या शब्दांनी लोकांच्या भावनांना ठेच पोहोचल्यानं दलाई लामांनी माफी मागितली,” असं त्यांच्या कार्यालयाकडून म्हटलं गेलं होतं.
 
तसंच पत्रकात असंही म्हटलं होतं की, “कधी कधी एखादं वक्तव्य संदर्भापासून वेगळं करत समोर ठेवलं जातं. अनेकदा त्याचे सांस्कृतिक संदर्भ वेगळे असतात. मस्करीत केलेलं वक्तव्य इतर भाषेत अनुवादित होताना त्यातली मजा जाते आणि गंभीर होतं. दलाई लामांना या गोष्टीचा खेद आहे.”
या पत्रकात असंही म्हटलं होतं की, दलाई लामांनी संपूर्ण आयुष्यात महिलांना वस्तू समजण्याच्या विचारांचा विरोध केला आहे आणि महिला-पुरुष समानतेचं समर्थन केलंय.
 
दलाई लामांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, तिबेटला परतणं यांसह अनेक मुद्द्यांवर मतं व्यक्त केली होती.
 
दलाई लामांनी शरणार्थींवरही वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, युरोपियन युनियनच्या शरणार्थींनी आपापल्या घरी परतलं पाहिजे.
 
यावरही नंतर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.
 
स्पष्टीकरण देणाऱ्या पत्रकात म्हटलं होतं की, “अनेक लोक आपल्या देशात परत जाऊ पाहत नाहीत, याचं त्यांनी कौतुक केलं होतं.”
 
डोनाल्ड ट्रंप यांच्यात नैतिकतेची कमतरता आहे, असंही ते म्हणाले होते. मात्र, या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली नव्हती.
 
तिबेटची परंपरा
जगभरातल्या अनेक देशांमध्ये जीभ बाहेर काढणं भलेही चांगली पद्धत मानली जात नसेल, पण तिबेटमध्ये अभिवादानाचा हा प्रकार आहे. नवव्या शतकापासूनची ही परंपरा आहे. तेव्हा तिथं एक राजा होता. त्याला लोक पसंत करत नव्हते. त्याचं नाव लांग दारमा होतं. त्याची जीभ काळी होती.
 
लोक असे मानायचे की, राजाचा पुनर्जन्म झालाय. सर्वसामान्य लोक जीभ काढून दाखवत असत आणि सिद्ध करू पाहत की पुनर्जन्म झालेला राजा आपण नाही. आता तिथल्या लोकांमध्ये आदर व्यक्त करण्यासाठीच जीभ काढण्याची परंपरा सुरू झाली.
31 मार्च 1959 रोजी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामांनी भारतात पाऊल ठेवलं. 17 मार्चला ते तिबेटची राजधानी ल्हासामधून पायी चालत निघाले होते आणि हिमालय पार करून 15 दिवसांनी भारताच्या सीमेअंतर्गत दाखल झाले होते. या प्रवासादरम्यान त्यांची कुठलीच माहिती कुणाला नव्हती. त्यामुळे अनेकांना वाटलं की त्यांचा निधन झालं असेल.
 
दलाई लामा यांच्यासोबत काही सैनिक आणि कॅबिनेट मंत्रीही होते. चीनच्या नजरेपासून बचाव करण्यासाठी केवळ रात्री ते प्रवास करत होते.
 
Published By- Priya Dixit