बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार

बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. आसाराम गेल्या 5 वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये 21 एप्रिलपासून 10 दिवस कलम 144 (जमावबंदी) लागू केले आहे.  
 
न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून 6 तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत. तसेच प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे.