शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (16:36 IST)

Farmers Protest : किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये सुरुवात, देशभरातील शेतकरी सहभागी

शहबाज अन्वर
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने आज (रविवार, 5 सप्टेंबर) किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
शहरातील सर्वात मोठ्या GIC मैदानात ही पंचायत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यातून याठिकाणी शेतकरी सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
 
शहरात काल रात्रीपासूनच शेतकरी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. अजूनही शेतकरी मुजफ्फरनगरमध्ये येत आहेत.शहरातील सर्व रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे.तसंच मैदानांमध्ये वाहनं, ट्रॅक्टर आणि बस यांचीच गर्दी दिसून येत आहे.

महापंचायतीच्या व्यासपीठावर भारतीय किसान युनियन संघटनेचे नेते राकेश टिकैत आणि अध्यक्ष नरेश टिकैत यांच्याशिवाय किसान मोर्चाशी संबंधित सर्व मोठे नेते उपस्थित आहेत.मुजफ्फरनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
 
भारतीय किसान युनियनचे माध्यम प्रभारी धर्मेंद्र मलिक म्हणाले, "देशातील कानाकोपऱ्यातून शेतकरी या महापंचायतीत सहभागी होतील. हरयाणा, पंजाबसह इतर राज्यांमधून महिला जत्थेदारही येणार आहेत. याठिकाणी पाच लाख शेतकरी जमा होतील, असं आम्हाला वाटतं."
"पंचायतस्थळी जास्त गर्दी होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी स्पीकर आणि एलईडी लावण्यात आले आहेत. शेतकरी तिथूनही पंचायतीत सहभागी होऊ शकतील," असं मलिक यांनी सांगितलं.
 
पण प्रशासनाचं याबाबत वेगळं मत आहे. याठिकाणी 50 हजार शेतकरी जमा होतील, असा अंदाज मुजफ्फरनगरचे उप-जिल्हाधिकारी दीपक कुमार यांनी व्यक्त केला.शेतकरी नेते आणि BKU पूर्व मंडलचे अध्यक्ष दिनेश कुमार यांनीही मोर्चाविषयी अधिक माहिती दिली.
 
राजकीय इंटर कॉलेजच्या विशाल मैदानावर ही महापंचायत आहे.याठिकाणी 70 ते 80 हजार शेतकरी बसू शकतात. व्यासपीठही 60 फूट लांब आणि रुंद तयार करण्यात आलं आहे.
 
ही महापंचायत ऐतिहासिक होईल, असा दावा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ट्विट करून केला.
राकेश टिकैत हे गाझीपूर बॉर्डरवरून किसान महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी मुजफ्फरनगरला जातील. हा संपूर्ण परिसर त्यांचे वडील महेंद्र टिकैत यांचं कार्यक्षेत्र मानला जातो. सुमारे 10 महिने सलग आंदोलनानंतर पहिल्यांदाच राकेश टिकैत आणि त्यांचा भाऊ नरेश टिकैत एकत्र दिसतील.महापंचायतीत जाट शेतकऱ्यांसह मुस्लीम समाजातील शेतकरीही दिसतील.
 
वरूण गांधींकडून महापंचायतला पाठिंबा
भाजप नेते वरूण गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. महापंचायतीची एक व्हीडिओ क्लिप ट्विटरवर शेअर करताना वरूण गांधी म्हणाले, "मुजफ्फरनगरमध्ये आज लाखो शेतकरी आंदोलनासाठी जमा झाले आहेत. तीसुद्धा आपलीच माणसं आहेत. आपण त्यांच्याशी आदरपूर्वक पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे. त्यांचं दुःख आणि मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे."

वरूण गांधी यांच्या ट्विटचं स्क्रिनशॉट राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते जयंत चौधरी यांनी पोस्ट केलं.
ते म्हणाले, "वरूण भाई यांच्या भूमिकेचं कौतुक व्हायला हवं. पण उत्तर प्रदेशातील खुर्जा मतदारसंघाचे आमदार विजेंद्र सिंह यांचं वक्तव्य बघा.विजेंद्र आपल्या मतदारसंघात जाऊन फालतू वक्तव्य करत आहेत."
जयंत यांनी सोबत विजेंद्र सिंह यांचं ट्विटही जोडलं आहे. विजेंद्र सिंह यांनी लिहिलं होतं, "माफ करा वरूणजी. तुम्हाला शेतकरी आणि राष्ट्रविरोधी शक्ती यांच्यात फरक ओळखण्याची गरज आहे."वाद वाढत असल्याचं पाहून नंतर विजेंद्र सिंह यांनी हे ट्वीट डिलीट केलं.