मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (09:52 IST)

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक

Former Andhra Chief Minister
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सीआयडीनं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. नायडू यांच्यावर लावण्यात आलेली कलमं अजामीनपात्र आहेत.
 
2021 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांना वैद्यकीय तपासणीसाठी नंदयाला रुग्णालयात हलवण्यात आलंय, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल.
 
फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 50 (1) (2) अंतर्गत शनिवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आंध्रप्रदेश मधील नंदयाला शहरात सार्वजनिक भाषणानंतर त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये विश्रांती घेत होते.
 
नुकचंच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा केला होता.
 
पोलीस पहाटे तीन वाजता पोहोचले
 
नायडूंना अटक करण्यासाठी सीआयडी आणि पोलिसांची पथकं पहाटे 3 वाजता पोहोचली होती. मात्र माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेखाली तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाने त्यांना रोखलं.
 
त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी नायडू हे त्यांच्या ताफ्यात व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोपले होते. अखेर सकाळी 6 वाजता पोलिसांनी बसचा दरवाजा ठोठावला आणि नायडूंना अटक केली.