1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 8 जुलै 2021 (11:14 IST)

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 87 वर्षाचे होते. आज पहाटे 4 वाजता मल्टी ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
वीरभद्र सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 13 एप्रिल रोजी मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी कोरोनावरही मात केली होती. रुग्णालयातून ते घरीही आले होते. मात्र, घरी आल्यावर त्यांची पुन्हा प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आयजीएमसी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने आज पहाटे त्यांनी अंतिम श्वास घेतला.
 
वीरभद्र सिंह यांचा जन्म 23 जून 1934 रोजी राज घराण्यात झाला होता. त्यांचे वडील राजा पद्मसिंह हे बुशर रियासतचे राजा होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय सहा वेळा ते मुख्यमंत्री बनले होते. यूपीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविलं होतं. त्यांनी केंद्रात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळलं होतं. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथील आमदार होते.