शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑगस्ट 2025 (10:51 IST)

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

shibu soren
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून आजारी होते. शिबू सोरेन व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती अनेक दिवसांपासून गंभीर होती. त्यांना एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्रीय राजधानीतील श्री गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना किडनीशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांनी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याची पुष्टी केली.
त्यांनी 'एक्स' वर लिहिले आहे की, 'आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहे. आज मी शून्य झालो आहे...' दरम्यान, सर गंगा राम रुग्णालयाने माहिती दिली की शिबू सोरेन यांना आज सकाळी ८:५६ वाजता मृत घोषित करण्यात आले.  

शिबू सोरेन हे गेल्या ३८ वर्षांपासून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते होते आणि पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून ओळखले जातात. शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी रामगडच्या नेमरा गावात झाला. १९६० च्या दशकात त्यांनी आदिवासींच्या हक्कांचे आणि जल-जंगल-जमिनीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू केला. १९७० च्या दशकात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ची स्थापना केली. त्यांचे मुख्य उद्दिष्ट वेगळ्या झारखंड राज्याची मागणी करणारी चळवळ चालवणे होते. या चळवळीत त्यांनी आदिवासींच्या जमीन हिसकावणे, शोषण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
१९८० मध्ये शिबू सोरेन पहिल्यांदाच लोकसभा सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी संसदेत अनेक वेळा आदिवासींचे प्रश्न उपस्थित केले आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि दीर्घ संघर्षामुळे १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली. राज्याच्या स्थापनेनंतर शिबू सोरेन २००५, २००८ आणि २००९ मध्ये तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले.  
Edited By- Dhanashri Naik