रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (14:38 IST)

भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार

aditya thackeray
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात  नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करेल. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.    
 
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच शरद पवारांची प्रकृती ठीक असल्यास ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Edited by : Ratnadeep Ranshoor