यशवंत सिन्हा यांचा भाजपला सोडचिठ्ठी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सिन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला. यापुढे कुठलंही राजकीय पद स्वीकारणार नाही. देशासाठी राष्ट्रमंचाची स्थापना करु अशी घोषणा यावेळी यशवंत सिन्हा यांनी केली. बिहारच्या पाटणामध्ये आयोजित कार्यक्रमात यशवंत सिन्हा बोलत होते.
मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही यशवंत सिन्हा यांनी जाहीर केले. भाजपाच्या कारभाराबद्दल अर्थात मोदी सरकारवर याआधीही सिन्हा यांनी टीका केली आहे. नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी यावरून त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत त्यांच्यावर ताशेरे झाडले आहे. आज अखेर आपली सगळी नाराजी बोलून दाखवत त्यांनी पक्षाला आणि पक्षीय राजकारणाला सोडचिठ्ठी दिली आहे.