शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (15:57 IST)

सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडेल : स्कायमेट

भारतात सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट संस्थेने यंदाच्या मॉन्सून हंगामासाठी वर्तवला आहे. यावर्षी १ जूनपासून मॉन्सूनला सुरूवात होईल. यंदाच्या वर्षी मॉन्सून हा सरासरीपेक्षा अधिक चांगला असेल असा अंदाज स्कायमेटने मांडला आहे. भारतात यंदा मॉन्सूनच्या कालावधीत म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पाऊस हा ९०७ मिलीमीटर असू शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. साधारणपणे मॉन्सूनच्या कालावधीत भारतात ८८०.६ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. या पावसाच्या कालावधीला लॉन्ग पिरियड एव्हरेज (एलपीए) असे म्हणतात. स्कायमेट याचा आधारावर मॉन्सूनची घोषणा करत असते. यंदा पश्चिम भारतात मुंबईसह महाराष्ट्राला चांगल्या पावसासाठी सप्टेंबरची वाट पहावी लागेल असे स्कायमेटच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
 
यंदाच्या मॉन्सूनच्या कालावधीत ज्याअर्थी ९०७ मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याअर्थी यंदाच्या मॉन्सून हंगामात भारतात १०३ टक्के इतक्या पावसाची नोंद होईल असे स्कायमेटने जाहीर केले आहे. ज्या वर्षी भारतात ८८०.६ मिलीमीटर पाऊस पडतो, त्यावर्षी १०० टक्के पाऊस पडला असे मानण्यात येते. त्यामुळेच यंदाचा ९०७ मिलीमीटर पावसाच्या अंदाजामुळे यंदा १०३ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉन्सूनच्या अंदाजामध्ये ९६ टक्के ते १०४ टक्के इतका पाऊस हा सरासरी पाऊस म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षांमध्ये म्हणजे २०१९ मध्ये पावसाची टक्केवारी १०० टक्के इतकी होती. तर २०२० मध्ये हीच पावसाची टक्केवारी १०९ टक्के इतकी होती. यंदाच्या मौसमातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी जूनमध्येच १७७ मिलीमीटर पाऊस पडू शकतो. तर जुलैमध्ये २७७ मिमी, ऑगस्टमध्ये २५८ मिमी आणि सप्टेंबरमध्ये १९७ मिमी पावसाचा अंदाज आहे. 
 
गेल्या वर्षी ज्या भागात पावसाने पाठ फिरवली होती, त्याठिकाणी यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये जूनमध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चांगल्या मॉन्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जुलैमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा आणि आंध्रप्रदेशात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दक्षिण पूर्व भारतात आणि कर्नाटकात यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मुंबई, महाराष्ट्रासाठी काय अंदाज ?सप्टेंबर महिन्यात मध्य प्रदेश तसेच देशातील पश्चिम भागात म्हणजे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईत पावसाची सुरूवात ही जून महिन्यात होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. पण स्कायमेटने हा अंदाज मांडताना संपुर्ण राज्यासाठीचा हा पावसाचा अंदाज मर्यादित नसून पुर्ण देशाचा असेल, असे स्पष्ट केले आहे.
 
मॉन्सूनच्या अंदाजामुळे साधारणपणे अतिवृष्टी, ओला दुष्काळ, उष्णतेची लाट, थंडीची लाट यासारख्या गोष्टींच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांसाठी उपाययोजना करणे शक्य असते. तसेच केंद्राला आणि राज्य सरकारलाही हवामानाशी संबंधित नैसर्गिक संकटांसोबत तयारी करण्याची वेळ या हवामानाच्या अंदाजामुळे मिळत असते. त्याअनुषंगानेच सरकारला आपल्या योजनांचे आणि पॅकेजचे नियोजन करणे शक्य होते.शेतीवरही पावसाचा परिणामचांगल्या पावसाचा परिणाम हा शेतीवरही होत असतो. गेल्या वर्षी चांगल्या पावसाच्या जोरावरच रब्बी हंगामात शेती उत्पादनामध्ये नवीन उच्चांक गाठणे शक्य झाले होते. क्रिसिलच्या आकडेवारीनुसार देशात नोव्हेंबर २०२० पर्यंत एकुण ३४८ लाख हेक्टर इतक्या भागात लागवड झाली होती. त्याआआधीच्या वर्षी ही लागवड ३३४ लाख हेक्टर इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षी ४ टक्के अतिरिक्त अशी शेती उत्पादनात वाढ झाली. तर गेल्या पाच वर्षांच्या तुलेत ही वाढ ५ टक्के अधिक होती.