लाखो तरुणांप्रमाणे आपणही अमेरिकेत जाऊन सुखी आयुष्य जगावं असं 35 वर्षीय सुखजिंदरचं स्वप्न होतं. पण आज कोणी अमेरिकेचं साधं नाव जरी काढलं तरी सुखजिंदरच्या अंगावर भीतीचा शहारा येतो.
सुखजिंदर सांगतो की, "आता तर मला अमेरिकेच्या नावाचीही भीती वाटते. परदेशात जायचा विषय जरी माझ्यासमोर निघाला तरी माझं शरीर भीतीने थरथर कापू लागतं. परदेशात जायच्या नादात मी उद्ध्वस्त झालो."
अमेरिकेला जाण्याच्या निर्णयामुळे सुखजिंदर उद्ध्वस्त झाला होता. तरनतारनचा रहिवासी असलेल्या सुखजिंदरची ओळख बालीत राहणाऱ्या सनी कुमार नावाच्या तरुणाशी झाली होती. ही ओळख एका नातेवाईकाच्या माध्यमातून झाली होती. तुला मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पाठवतो असं आश्वासन सनीने सुखजिंदरला दिलं होतं. पण यासाठी सुखजिंदरला आधी बालीला जायचं होतं. तिथून पुढे त्याचा प्रवास सुरू होणार होता. या डीलसाठी 45 लाख रुपये द्यायचे ठरले.
परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक होणं ही गोष्ट पंजाबसारख्या राज्यासाठी काही नवी नाहीये. पण कोणतीही आगाऊ रक्कम न घेता बालीचं तिकीट पाठवल्याने सुखजिंदरचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला.
पण इथेच सुखजिंदरच्या कथेला नवं वळण मिळालं ज्याची त्याने स्वप्नातही कल्पनाही केली नसेल. सुखजिंदर सांगतो, "बालीला पोहोचल्यावर सनी कुमारने मला एका घरात कोंडून ठेवलं. मी जवळपास 23 दिवस कैदेत होतो."
सुखजिंदर पुढे सांगतो, "त्यांनी मला तिथं इतकं मारलं की, मला माझ्या घरच्यांशी खोटं बोलावं लागलं की, मी अमेरिकेत पोहोचलोय आणि सनीला 45 लाख रुपये द्या. 45 लाख देऊनही हा त्रास थांबला नाही. खूप प्रयत्नांनंतर मी घरी पोहोचू शकलो."
तरनतारनच्या जसविंदर सिंग सोबत सुद्धा अशीच काहीशी गोष्ट घडली होती. 5 ऑक्टोबर 2022 रोजी तो या टोळीच्या भूलथापांना बळी पडून बालीला गेला. 18 दिवस या टोळीने त्याला डांबून ठेवलं होतं. त्यालाही आपला जीव वाचवण्यासाठी 45 लाख रुपये मोजावे लागले.
मोहालीचे डीएसपी दिलशेर सिंग यांच्या म्हणणयाप्रमाणे अमेरिकेच्या नावावर केवळ पंजाबमधील तरुणच नव्हे, तर भारतातील चार राज्यातील तरुण बळी पडलेत. या टोळीचा कारभार इंडोनेशियातील बालीतून चालतो.
ही टोळी कशी काम करते ?
फसवणूक झालेल्या तरुणांनी सांगितल्याप्रमाणे आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरून या टोळीचं पंजाबमध्ये स्वत:चं कोणतंही कार्यालय नसल्याचं समोर आलंय. परदेशात घेऊन जाणाऱ्या एजंट आणि कंपन्यांच्या जाहिराती तुम्हाला पंजाबमध्ये सर्वत्र पाहायला मिळतील. पण या टोळीची एकही जाहिरात आजवर सापडलेली नाही.
ही टोळी आपलं सावज हेरण्यासाठी मोबाईलचा वापर करते. साधारणत: गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांकडून एकही पैसा न घेता बालीचं तिकीट दिलं जातं. त्यामुळे या तरुणांचा आत्मविश्वास वाढतो. आता आपण मेक्सिकोमार्गे अमेरिकेत जाऊ याविचाराने हे तरुण बाली गाठतात.
मात्र, कुटुंबीयांकडून खंडणी मिळावी म्हणून या तरुणांना डांबून मारहाण केली जाते. खंडणी देऊन सुटका झाल्यानंतर घरी कसं जायचं याची सोय त्या पीडित व्यक्तीलाच करावी लागते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रीय होती. ही टोळी साधारणपणे कमी शिकलेल्या तरुणांना आपलं सावज म्हणून हेरायची. माहितीनुसार, या तरुणांना इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्येच बोलावलं जायचं. कारण या देशांमध्ये भारतीयांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय आहे. या देशांचा विमान प्रवास देखील इतर देशांपेक्षा स्वस्त आहे.
या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे?
मोहाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे दोन सूत्रधार भारतीय आहेत. सध्या इंडोनेशियामध्ये असलेला सनी कुमार हा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील सलेरिया खुर्द गावचा रहिवासी आहे. तर जसवीर सिंग उर्फ संजय सध्या सिंगापूरमध्ये असून तो जालंधरचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीतील काही सदस्य पंजाबमध्ये तर उर्वरित बालीमध्ये सक्रिय आहेत. पंजाबमधील लोक अपहरण केलेल्या तरुणांकडून पैसे उकळण्याचं काम करतात. तर बालीतील टोळी तरुणांना तिथे बोलवून त्यांचं अपहरण करते.
सध्या पोलिसांनी टोळीचा म्होरक्या असलेल्या सनीची पत्नी आणि वडिलांना पंजाबमधून अटक केली असून त्यांच्या घरातून दीड कोटी रुपये जप्त केलेत. याशिवाय पंजाबमधून या टोळीसाठी काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केलीय. टोळीचा दुसरा म्होरक्या अजूनही इंडोनेशियामध्येच आहे.
ग्रामीण भागातील तरुण ठरतात बळी...
पटियालाच्या पहल कलान गावातील मनप्रीत सिंग देखील अशाच एका फसवणुकीचा बळी ठरला होता. तो सांगतो, मी एका खाजगी कंपनीत कामाला होता आणि त्याच्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण होतं. त्यामुळे त्याने अमेरिकेला जाण्याचा विचार केला. त्यासाठी तो एजंट शोधत असताना राजपुराच्या एजंटने त्याला जाळ्यात अडकवलं.
मनप्रीतने जशी आर्थिक अडचण सांगितली अगदी तशीच अडचण सुखजिंदरनेही सांगितली. तो सांगतो, गावात त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीतून निघणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करणं कठीण होतं. पहल गावातील जसवीर सिंगनेही आपली जमीन विकून अमेरिकेला जाण्यासाठी कर्ज घेतलं.
तो सांगतो, "देणेकरी आता पैसे मागतात, काय करायचं आता सुचत नाहीये."
पंजाबमधील तरुणांमध्ये परदेशी जाण्याचा हा ट्रेंड नवा नाहीये. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे परदेशी जाऊन यशस्वी झालेले पंजाबी स्थलांतरित. यांच्यासारखंच आपणही यशस्वी व्हावं या उद्देशाने हे पंजाबी तरुण परदेशी जाण्याची स्वप्न बघतात. डिग्री आहे, त्यांच्यासाठी कायदेशीर मार्गाने परदेशात काम शोधणं सोपं असतं. पण कमी शिकलेल्या गावातील तरुणांकडे हा पर्याय नसतो. त्यामुळेच ते बनावट टोळ्या किंवा एजंटांच्या जाळ्यात अडकतात.
अशाच फसवणुकीला बळी पडलेला पटियालाचा विशाल कुमार सांगतो, "शिकलेले तरुण आयईएलटीएस परीक्षा पास होऊन परदेशात जातात पण आमच्यासारखे कमी शिकलेले तरुण बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याचा विचार करतात."
दहावी पास होऊनही कोणतीच नोकरी न मिळाल्याने तो या टोळीच्या जाळ्यात अडकला. शेवटी पैसे देऊन त्याला आपला जीव वाचवावा लागला.
पंजाबमधील प्रसिद्ध अर्थतज्ञ रणजित सिंग घुमन सांगतात की, बेरोजगारी, ड्रग्ज आणि गँगस्टर यांच्या विबळख्यामुळे पंजाबमधील तरुणांना त्यांचं भविष्य अंधारात दिसत आहे, त्यामुळे ते परदेशात जाण्याची स्वप्न बघत आहेत. त्यांच्या मते पंजाबमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत नसल्याने तरुण मोठ्या प्रमाणात परदेशाचा मार्ग धरत आहेत.
आर्थिक सर्वेक्षण 2021-22 नुसार पंजाब मधील बेरोजगारीचा दर 7.3 टक्के आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर 7.1 टक्के आणि शहरी भागात 7.5 टक्के आहे. तरुणांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यात रोजगाराच्या संधी आणि गुंतवणूक वाढवावी लागेल, असं घुमन यांना वाटतं.
कायदा अस्तित्वात असतानाही फसवणूक सुरूच..
पंजाबमध्ये मानवी तस्करीच्या विरोधात पंजाब ट्रॅव्हल प्रोफेशनल्स अॅक्ट 2014 अस्तित्वात आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात जालंधर प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 239 इमिग्रेशन सल्लागार आणि 129 आयईएलटीएस केंद्रांचे परवाने रद्द केले होते. जालंधर पोलिस उपायुक्तांच्या मते, जालंधर जिल्ह्यातील 1320 इमिग्रेशन सल्लागार, परदेशी तिकीट बुकर्स आणि आयईएलटीएस केंद्रांच्या मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी 495 जणांचे परवानेही रद्द करण्यात आलेत.
यावर रणजितसिंग घुमन सांगतात की, सरकारने बनावट एजंट पकडण्यासाठी कडक कायदे केले असले तरी, तरीही बनावट एजंट त्यांचं काम चोखपणे पार पाडतात. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे कायदेशीर प्रक्रिया खूप लांब आणि किचकट असते. घुमन सांगतात की, अवैध पद्धतीने परदेशात जाताना अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. आणि एवढं असून देखील पंजाबचे तरुण कोणत्याही किंमतीत परदेशी जायला उत्सुक असतात.
अवैध पद्धतीने अमेरिकेत जाण्याकडे कल..
भारतीय लोक विशेषतः पंजाबमधील तरुण मेक्सिकोची सीमा ओलांडून अमेरिकेत जाण्याचा ट्रेंड फार जुना आहे. बरेच जण कॅनडा मार्गे अमेरिकेत जातात. पण मेक्सिको मार्गे अमेरिकेत जाण्याचं प्रमाण मोठं आहे.
हे एजंट मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेवर बांधलेली भिंत पार करवून देण्यासाठी पैसे घेतात. अमेरिका कस्टम्स आणि बॉर्डर पेट्रोलच्या आकडेवारीनुसार, मेक्सिको सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांची संख्येत वाढ होत आहे.
या विभागाच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 19 हजार 883, 2021 मध्ये 30 हजार 662 आणि 2022 मध्ये 63 हजार 927 भारतीयांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करणं तेवढं सोपं नाही. 2019 मध्ये मेक्सिकोची सीमा चर्चेत आली होती. या सीमेवरून पंजाबी वंशाची एक स्त्री आणि तिची सहा वर्षांची मुलगी बेकायदेशीरपणे अमेरिकेत निघाल्या होत्या. पण 42-अंश तापमानात उष्णतेमुळे सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
Published By -Smita Joshi