रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:20 IST)

मी त्याची हत्या केली, डोकं धडावेगळं केलं, छाती कापून हृदय बाहेर काढलं.

friends
Article information
Author,अमरेंद्र यरलागड्डा
UGC
(या बातमीतले काही तपशील तुम्हाला विचलित, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करू शकतात.)
 
“17 तारखेच्या मध्यरात्री मी आणि नवीन रमादेवी पब्लिक स्कूलच्या दिशेनं जाणाऱ्या रस्तानं गेलो. नवीनला एक निर्जन ठिकाणी घेऊन गेलो. तिथं नवीनला मी विचारलं, मी त्या मुलीवर प्रेम करतो. तू दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोस. मग पुन्हा मी प्रेम करत असलेल्या मुलीला का त्रास देतोयेस?”
 
“नवीननं मला धक्का मारला आणि म्हणाला की, तिच्यावर मी प्रेम करतो, तू तिला विसरून जा. त्यामुळे मग मी त्याला हातांनी जोरात मारलं. आम्ही एकमेकांना मारू लागलो. मी नवीनला खाली पाडलं आणि त्याच्यावर बसून त्याचा गळा आवळला.”
 
“रागाच्या भरात मी त्याचे कपडे फाडले आणि सोबत आणलेल्या पिशवीतून चाकू काढला. त्या चाकूनं नवीनचं डोकं धडावेगळं केलं. त्यानंतर छाती कापून हृदय बाहेर काढलं. नंतर दोन बोटं कापली. मग आजूबाजूला कुणी नाही ना, याची खातरजमा करून मृतदेह ओढत नेऊन बाजूच्या झाडांमध्ये फेकून दिला.”
 
वाचतानाही थरकाप उडावा अशी कबुली आहे हरिहरकृष्णाची.
 
हैदराबादमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवीन नावाच्या विद्यार्थ्याच्या हत्येनं सर्वत्र खळबळ उडवली आहे.
 
या हत्या प्रकरणी पोलिसांनी हयाथनगर न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केलाय. यात पोलिसांनी हत्येमागची कारणं नमूद केली आहेत.
 
अब्दुल्लापूरमेटचे पोलीस निरीक्षक व्ही. स्वामी यांनी सांगितलं की, नवीन-हरीहरकृष्णा यांच्या या प्रकरणाची आयपीसी कलम 302 आणि 201, तसंच, एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत चौकशी केली जात आहे.
 
‘मी प्रेम करत असलेल्या मुलीशी त्यानं लैंगिक संबंध ठेवले...’
प्रेम संबंध आणि त्यातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस सांगतात.
 
हरिहरकृष्णानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मी आणि हरिहरकृष्णा मित्र होतो. मी जिच्यावर प्रेम करत होतो, तिलाच नवीन त्रास देत होता. नवीन माझ्याशी नीट बोलतही नव्हता. त्याने मी प्रेम करत असलेल्या मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले.”
 
हरिहरकृष्णा तीन महिन्यांपासून नवीनच्या हत्येचा कट रचत होता. हत्येसाठी त्याने मलकापेटमधून 200 रुपयांचा चाकू आणि मेडिकलमधून ग्लोव्ह्ज खरेदी केले.
 
16 जानेवारीला कॉलेजमधले सर्व मित्र भेटणार होते. तेव्हाच नवीनला मारण्याचा हरिहरकृष्णाचा कट होता. मात्र, त्यादिवशी त्याला ते शक्य झाले नाही. हरिहरकृष्णानंच हे पोलिसांसमोर कबुली देताना सांगितलं.
 
पुढे मग 17 फेब्रुवारीला नवीन हैदराबादला येत असल्याचं त्याने सांगितलं. मग त्याला सोबत घेऊन जीवन नावाच्या आणखी एका मित्रासह ते नागोलू इथं हॉटेलमध्ये जेवायला गेले.
 
त्यानंतर जीवन त्याच्या घरी गेला. पण नवीन आणि हरिहरकृष्णा वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करत फिरत होते. मग नवीननं हरिहरकृष्णाला नलगोंडा इथल्या वसतिगृहात जाण्याबाबत विचारलं. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून त्या दिशेनं निघाले. पेड्डा अंबरपेठ इथून दारू खरेदी करून प्यायले आणि तिथून निघाले.
 
मग हरिहरकृष्णानं नवीनला सांगितलं की, दारू पिऊन एवढ्या लांब जाणं योग्य नाही. म्हणून रामोजी फिल्मसिटीजवळून यूटर्न घेऊन ते मागे फिरले.
 
मग तिथून हरिहरकृष्णाने नवीनला रमादेवी पब्लिक स्कूलच्या दिशेनं नेऊन निर्जन जागा पाहून त्याची हत्या केली.
 
नवीनला मारल्याचं प्रेयसीला सांगितलं...
नवीनला मारल्याचं हरिहरकृष्णानं त्याच्या एका मित्राला आणि प्रेयसीला अशा दोघांना सांगितलं.
 
“नवीनची हत्या केल्यानंतर ब्राह्मणपल्लीला गेलो. नवीनचं डोकं, पँट, चाकू आणि मोबाईल रस्त्याच्या कडेला फेकून दिला,” असं हरिहरकृष्णानं पोलिसांना सांगितलं.
 
त्यानंतर हरिहरकृष्णा हसन नावाच्या मित्राच्या घरी गेला. तिथं अंघोळ केल्यानंतर हत्येचा प्रकार हसनला सांगितला. तो प्रकार ऐकून हसन घाबरला. त्यानं हरिहरकृष्णाला सांगितलं की, पोलिसांना शरण जा.
 
दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 फेब्रुवारीला हरिहरकृष्णानं कपडे सागर कॉम्प्लेक्समधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले आणि रस्त्यावर येऊन ओरडू लागला की, नवीनला मी मारलंय.
 
त्यापूर्वी त्याने प्रेम करत असलेल्या मुलीला फोन करून नवीनला मारल्याचं सांगितलं. तेव्हा ती घाबरली आणि त्याला बोल लावायला लागली.
 
नंतर वारलंगमध्ये वडिलांच्या घरी हरिहरकृष्णा पोहोचला.
 
हरिहरकृष्णा नंतर कुठे कुठे फिरला?
पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, हरिहरकृष्णाला नवीनच्या काकांचा फोन आला आणि नवीन बेपत्ता आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावेळी हरिहरकृष्णानं सांगितलं की, मला माहित नाही, नवीनने माझ्याशी भांडण केलं आणि गांजा ओढू नको, असं त्याला सांगितल्यावर तो निघून गेला.
 
21 फेब्रुवारीला नवीनच्या काकांनी सांगितलं की, मी पोलीस ठाण्यात तक्रार करत आहे. तेव्हाही हरिहरकृष्णानं काहीच सांगितलं नाही.
 
हरिहरकृष्णानं पोलिसांना सांगितलं की, “मी घाबरलो होतो. फोन घरीच सोडून कोदाडाकडे गेलो. मी तिथं बाईक ठेवली. मग तिथून विजयवाडा, खमम्म, विशाखापट्टणम आणि इतर ठिकाणी फिरलो. मग 23 फेब्रुवारीला कोदाडाला परतलो आणि बाईक घेऊन वारांगलला गेलो. मग तिथे जाऊन वडिलांना नवीनच्या हत्येबद्दल सांगितलं. त्यांनी मला फटकारलं आणि पोलिसांना शरण जाण्यास सांगितलं.”
 
“तिथून नवीनचं डोकं, कपडे आणि शरीराचे इतर अवयव जिथं टाकले, त्या ठिकाणी जाऊन तिथून ते सर्व प्लास्टिकच्या पिशवीत टाकून परत आणले. ते सर्व जाळून टाकले. खरंतर ते सर्व आधीच कुजले होते. त्यानंतर 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं,” असंही हरिहरकृष्णानं पोलिसांना सांगितलं.
 
‘नवीनच्या कुटुंबाची माफी मागतो...’
हरिहरकृष्णाचे वडील प्रभाकर करिमामाबदमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “नवीनच्या कुटुंबाची मी माफी मागतो.”
 
“शिवरात्रीच्या दिवशी जेव्हा हरिहरकृष्णा घरी आला तेव्हा तो काळजीत दिसला. आम्ही त्याला काळजीचं कारण विचारलं. पण त्यानं काहीच सांगितलं नाही आणि तो हैदराबादला निघून गेला. दोन दिवसांनी त्याचा फोन स्विच ऑफ आला. मग 23 फेब्रुवारीला तो परतला.”
 
“त्यानं आम्हाला सांगितलं की माझ्याशी झालेल्या झटापटीत नवीनचा मृत्यू झाला. मग आम्ही त्याला पोलिसांसमोर शरण व्हायला सांगितलं,” असं प्रभाकर म्हणाले.
 
“एका मुलीमुळे दोघांचं आयुष्य बरबाद झालं. एक मृत्युमुखी पडला, दुसरा तुरुंगात गेला,” असंही ते म्हणाले.
Published By -Smita Joshi