गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (20:49 IST)

अमृतपाल सिंहचा एक लाईव्ह व्हीडिओ समोर, तो म्हणतो...

खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा सर्वेसर्वा अमृतपाल सिंहने एक व्हीडिओ स्टेटमेंट जारी केलं आहे.
 
पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहवर 18 मार्चला कारवाई केली होती. त्या दिवसापासून तो फरार आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्या काही साथीदारांना अटक केली आहे.
 
अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांविरोधात शांतता भंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करणे आणि पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून रोखणे अशा विविध आरोपांखाली सुमारे 16 गुन्हे दाखल करण्यात आलेत..
 
हा व्हीडिओ अचानक विविध डिजिटल आणि सॅटलाईट चॅनलवर प्रसारित होऊ लागला आहे.
 
पोलिसांनी हा व्हीडिओ कुठून आला आहे याबद्दल काही सांगितलेलं नाही मात्र हा व्हीडिओ पाहता अमृतपाल पोलिसांच्या ताब्यात नाही हे नक्कीच सिद्ध होतं.
 
लवप्रीत सिंगची सुटका करावी म्हणून अमृतपाल सिंग आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या समर्थकांनी 23 फेब्रुवारीला अमृतसरजवळील अजनाला येथील पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली होती.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मोर्चामुळे 18 मार्च रोजी अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांना जालंधरमधील शाहकोट-माल्सियान रोडवर अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो तिथून निसटला.
 
त्या दिवसापासून अमृतपाल सिंह पंजाब पोलिसांना गुंगारा देतोय. पंजाब पोलिस दलातील डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 353 जणांपैकी 197 जणांची रविवारी सुटका करण्यात आली आहे.
 
अमृतपाल सिंह व्हीडिओमध्ये काय म्हणाला?
आता अमृतपाल सिंहने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून हा व्हीडीओ कोणत्या वेळी तयार केला आहे हे निश्चित सांगता येणार नाही. पण या व्हीडिओमध्ये अकाल तख्तचे जाथेदार हरप्रीत सिंह यांचा उल्लेख करण्यात आलाय. हरप्रीत सिंह यांनी 27 मार्च रोजी एक बैठक बोलावली होती.
 
27 मार्च रोजी अकाल तख्त साहिब इथं पार पडलेल्या या पंथक बैठकीत जथेदार हरप्रीत सिंग यांनी अमृतपाल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निरपराध तरुणांची सुटका करण्यासाठी पंजाब सरकारला 24 तासांची मुदत दिली होती.
 
या व्हीडिओमध्ये अमृतपाल सिंहने 18 मार्चच्या घटनेचा उल्लेख करत म्हटलंय की, "मला जर अटक करायचीच होती तर सरकारने घरातून अटक केली असती, मी स्वतःहून पोलिसांसोबत गेलो असतो. पण त्यांनी माझ्यामागे पोलिसांचा मोठा फौज फाटा लावला.. पण सर्वशक्तिमान परमेश्वराने मला वाचवलं.”
 
“तेव्हापर्यंत मला असं वाटलं की सरकारला आम्हाला मालवा भागात जाऊ द्यायचं नाही आणि आम्हाला खालसा वाहिर काढता येणार नाही. मला असं वाटलं की आम्ही मालव्याला जावं. तिथूनच आम्ही खालसा वाहीर चालू करावं.,
 
खालसा वाहीर हा एक प्रकारचा मोर्चा होता जो अमृतपाल सिंह ने पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून काढण्याचं ठरवलं होतं. 19 मार्चला त्या मुक्तसार भागातून या मोर्च्याचा दुसरा अध्याय सुरू होणार होता.
 
जेव्हा इंटरनेट बंद झालं तेव्हा आमचा काहीही संपर्क नव्हता. बातम्यांमध्ये काय होतंय याची आम्हाला काहीही माहिती नव्हती. आता मी तुमच्याशी बोलतोय. पंजाबमध्ये काय होतंय हे मला कळतंय
 
“जाथेदार साहेबांनी एक बैठक बोलावली होती. त्यात असं ठरलं होतं की सरकारला 24 तासाची मुदत द्यायची. मात्र सरकारने आम्हालाच आव्हान दिलं. त्यांनी अकाल तख्तची प्रतिष्ठा कमी केली.
 
“मला असं वाटतं की जाथेदार साहेबांनी याविषयी ठाम भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सरबत खालसा या शीख संसदेची बैसाखीच्या दिवशी सभा बोलवायला हवी.”
 
शीख समुदायाचे लोक अमृतसरला सुवर्ण मंदिरात अकाल तख्त मध्ये राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतात. त्याला सरबत खालसा असं म्हणतात. ही परंपरा 18 व्या शतकात सुरू झाली. मात्र अकाल तख्तच्या शिवायसुद्धा सरबत खालसा बोलावलं जातं.
 
28 मार्चला जथेदार हरप्रीत सिंह आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक उडाली होती. याचाही उल्लेख या व्हीडिओ मध्ये करण्यात आलाय.
 
पोलिसांचं या व्हीडिओबद्दल काय मत आहे?
पंजाब पोलीस उपमहानिरीक्षक नरेंद्र भार्गव यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या व्हीडिओची पुष्टी करण्यास नकार दिला.
 
ते म्हणाले, “ज्या अर्थी त्याने व्हीडिओ पाठवला त्या अर्थी तो आमच्या ताब्यात नाही हे स्पष्ट होतं.”
 
ते म्हणाले की पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत आहेत. अमृतपाल सिंहने आत्मसमर्पण केल्या अशा अफवा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा व्हीडिओ आला आहे.
 
अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग म्हणाले, “जर एखाद्याला सुवर्ण मंदिरात येऊन आत्मसमर्पण करायचं असेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल याची मी शाश्वती देतो. त्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही.”
 
“काही अफवा असतील तर मला त्याची कल्पना नाही, पण आम्ही कायद्यानुसार योग्य ती कारवाई करत आहोत.
Published By -Smita Joshi