मुंबई-दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; काँग्रेसवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बई दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. दौसा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी भंडारेज ते सोहना या तयार महामार्गाचे उद्घाटन केले. दिल्ली-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असेल. यावेळी जनतेला संबोधन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सीमाभागात रस्ते बांधण्यास घाबरत होते. आपण बांधलेल्या रस्त्याने शत्रू देशात येतील, अशी त्यांना भीती वाटत होती. आपल्या सैनिकांच्या शौर्य व धाडसाला काँग्रेस का कमी लेखत होती? हे मला कळत नाही." असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हेच विकसित होणाऱ्या भारताचे भव्य चित्र असून असे आधूनिक रस्ते बनतात तेव्हा देशाच्या प्रगतीला चालना मिळते. हा प्रकल्प राजस्थानसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातचे चित्र बदलून टाकणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणखी एक बाजू आहे. तो तयार झाल्यावर शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांना अनेक सुविधा मिळतात. दिल्ली - दौसा - लालसोट दरम्यानच्या या महामार्गाप्रमाणे जयपूर ते दिल्ली प्रवासाचा वेळ निम्म्या वेळेने कमी होईल." असे त्यांनी सांगितले.