शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (10:02 IST)

अदानी समूहाबाबतच्या हिंडनबर्ग रिपोर्टमागे काही अजेंडा आहे का?

Gautam Adani
अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी असलेल्या  हिंडनबर्गने आपल्या एका रिसर्चमधून अदानी समूह सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतल्याचे गंभीर आरोप केलेत.
 
मात्र अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हा रिपोर्ट निराधार असल्याचं म्हटलंय. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
 
हिंडनबर्गने 24 जानेवारी रोजी 'अदानी ग्रुप: हाऊ द वर्ल्डस थर्ड रीचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्ट्री' नावाचा हा रिपोर्ट पब्लिश केला होता.
 
ही तारीख खूप महत्त्वाची होती कारण हा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे 27 जानेवारीला गौतम अदानींची कंपनी शेअर बाजारात सेकंडरी शेअर्स लाँच करणार होती. आणि साधा सुधा विषय नसून तब्बल  20 कोटींचा सर्वात मोठा एफपीओ आहे.
 
अमेरिकेच्या या फायनान्शियल फॉरेन्सिक रिसर्च कंपनीने पब्लिश केलेल्या रिपोर्टमुळे भारतात खळबळ माजली,  मीडियामध्ये या कंपनीच्या हेडलाईन्स बनू लागल्या.
 
या रिपोर्टमध्ये कंपनीने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला 88 प्रश्न विचारलेत. यातले काही प्रश्न  अतिशय गंभीर असून, थेट अदानी समूहाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सला टार्गेट करतात.
 
हा रिपोर्ट सार्वजनिक होताच अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. समुहाच्या शेअर्सवर विक्रेत्यांचं वर्चस्व राहिलं आणि बघता बघता अदानी समूहाच्या गुंतवणूकदार आणि प्रमोटर्सच्या लाखो कोटींच्या बाजार भांडवलात लक्षणीय घट आली.
 
फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत 18 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे फोर्ब्स मासिकाच्या रिअल-टाइम यादीनुसार अदानी चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरले आहेत.

एक रिसर्च रिपोर्ट आणि 88 प्रश्न
एका रिसर्च रिपोर्टमुळे अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण
एक रिसर्च रिपोर्ट आणि अदानी समूहाच्या 4 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचं नुकसान
एक रिसर्च रिपोर्ट आणि जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती घसरली सातव्या क्रमांकावर
अदानी समूहाने परदेशी गुंतवणूकदारांना प्रेजेंटेशन आणि सोबत काही प्रश्नांची उत्तरे दिली.
अदानी समूहाने हा रिपोर्ट फेटाळून लावत तो निराधार असल्याचं म्हटलंय.
अदानी ग्रुपचे सीएफओ जुगशिंदर सिंग यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ते म्हणतात की, हा रिपोर्ट पब्लिश करण्यापूर्वी समूहाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही, तसेच फॅक्टस व्हेरिफाय करण्याचे कष्टही घेण्यात आले नाहीत.
 
अदानी समूहाचे लीगल हेड जतिन जलुंधवाला म्हणाले की, अदानी ग्रुप हिंडनबर्ग रिसर्चविरुद्ध भारतात आणि अमेरिकेत 'सुधारात्मक आणि दंडात्मक' कारवाई करण्याच्या विचारात आहे.
 
तेच हिंडेनबर्ग रिसर्चही आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. हिंडेनबर्गने आपल्या ट्विट मध्ये उत्तर देत म्हटलंय की, "आतापर्यंत अदानी समूहाने आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे अदानींनी धमकी देण्याचा मार्ग निवडला."
 
"माध्यमांना दिलेल्या निवेदनात अदानी समूहाने आमच्या 106 पानांच्या, 32 हजार शब्दांच्या आणि 720 हून अधिक उदाहरणांच्या 2 वर्षांची मेहनत घेऊन तयार केलेल्या रिपोर्टला "निराधार" म्हटलंय. आणि आमच्याविरोधात  दंडात्मक कारवाई करण्यासाठी ते अमेरिकेतील आणि भारतातील कायद्यांची चाचपणी करत आहेत."
"कंपनीने ज्या कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. पण आम्ही आमच्या रिपोर्टवर ठाम आहोत आणि आमच्यावर केलेली कोणतीही कायदेशीर कारवाई निराधार असेल."
 
"जर अदानी याविषयी गंभीर असतील तर त्यांनी अमेरिकेत गुन्हा दाखल करावा. कागदपत्रांची एक मोठी यादी आहे. कायदेशीर प्रक्रियेदरम्यान आम्ही त्यांच्याकडून या कागदपत्रांची मागणी करू."
 
पण 88 प्रश्न विचारणाऱ्या या हिंडनबर्गलाही दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. यातला पहिला प्रश्न म्हणजे स्वतःला 'अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलिंग' म्हणवणारी कंपनी कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्यासाठी असं करत नाहीये ना? आणि दुसरा प्रश्न आहे रिपोर्टच्या वेळेबाबत.
 
शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ येणार होता आणि त्याच्या आधी 2 दिवस हा रिपोर्ट पब्लिश करण्यात आला. हे सगळं मुद्दाम केलं का?
शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?
तर हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याआधी शॉर्ट सेलिंग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कारण या शॉर्ट सेलिंगवरून  बऱ्याच लोकांनी हिंडनबर्गच्या हेतूवर शंका उपस्थित केलीय.
 
तर शॉर्ट सेलर म्हणजे, ज्याच्याकडे शेअर्स नसतात आणि तरीही तो त्याची विक्री करत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल की जर शेअर्सच नाहीयेत तर नेमकी विक्री कशाची होतेय?
 
समजा... जर 100 रुपयांचा शेअर घसरून 60 रुपयांपर्यंत येईल असं एखाद्या शॉर्ट सेलरला वाटलं तर तो ब्रोकरकडून काही शेअर्स उधारीवर घेतो आणि दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकतो. आणि तो हे शेअर्स 100 रुपयांच्या दरानेच विकतो. आणि जेव्हा हा शेअर 60 रुपयांवर घसरतो तेव्हा हा शॉर्ट सेलर तो शेअर विकत घेऊन ब्रोकरला देऊन टाकतो. आता यातून त्याने 40 रुपयांचा नफा कमावतो.
 
अदानी समूहाने टॅक्स वाचवण्यासाठी परदेशातील अनेक कंपन्यांचा वापर केला?
आता हिंडनबर्ग रिसर्च मध्ये असं म्हटलंय की, टॅक्स हेवन कंट्रीज म्हणजेच मॉरिशस आणि कॅरिबियन देशांमध्ये जो पैसा गुंतवला जातो त्याचा स्रोत सांगण्याची आवश्यकता नसते.
 
शिवाय या देशांमध्ये टॅक्स देखील खूप कमी आहे. अशाच देशांमध्ये अदानी समुहाच्या अनेक शेल कंपन्या आहेत.
 
अदानी समूहाने या प्रश्नावर थेट उत्तर दिलेलं नाही. पण असं म्हटलंय की, "कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी बोलायचं झाल्यास  समूहाच्या मोठ्या चार कंपन्या फक्त बाजारपेठेतच नाही तर
 
कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या क्षेत्रात पहिल्या सात कंपन्यांमध्ये मोडतात."
 
गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांच्यावर कस्टम टॅक्स चुकवणे, आयतीशी संबंधित बनावट कागदपत्रे तयार करणे, अवैध कोळसा आयात करणे यांसारखे आरोप आहेत. आणि तरीही त्यांना समूहाच्या संचालक पदावर बसविण्यात आलंय.
 
गौतम अदानी यांचे मेहुणे समीर व्होरा महत्त्वाच्या पदावर का आहेत? बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून डायमंड ट्रेडिंग मध्ये नाव आलेले समीर व्होरा ऑस्ट्रेलिया डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर का आहेत?
 
हिंडनबर्गच्या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह
सरकारी यंत्रणांची चौकशी सुरू आहे. त्यांनी परदेशात बनावट कंपन्यांच्या माध्यमातून अदानीच्या कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.
 
यात हवाला मार्गे आलेल्या पैशांचा देखील समावेश अहे. याच पैशाच्या माध्यमातून अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
 
अदानी समूहाचं म्हणणं आहे की, हिंडनबर्ग रिपोर्टमधील 88 पैकी 21 प्रश्न तर आधीच पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत.
 
त्यामुळे त्यांनी 2 वर्षांचा रिसर्च केलाय हा दावा खोटा आहे. शिवाय त्यांनी जे निष्कर्ष काढलेत ते 2015 पासून कंपनीने वेगवेगळ्या डिस्क्लोजर मध्ये प्रसिद्ध केलेत. हे प्रश्न व्यवहार, महसूल विभाग आणि न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित आहेत.
अदानी समूहातील काही कंपन्यांच्या ऑडिटर्सवर प्रश्न..
अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅस या कंपनीचं  ऑडिट एका लहान कंपनीकडून करवून घेण्यात आलंय.
 
विशेष म्हणजे या कंपनीची स्वतःची वेबसाईट ही उपलब्ध नाही. या कंपनीत चार पार्टनर आणि 11 कर्मचारी आहेत.  ही ऑडिट कंपनी आणखीन एका सूचीबद्ध कंपनीचं ऑडिट करते. हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये आरोप करण्यात आलाय की, "अदानी एंटरप्रायझेसच्या 156 उपकंपन्या आणि अनेक जॉईंट व्हेंचर्स आहेत. त्यामुळे एवढं ऑडिट करणं या कंपनीसाठी कठीण आहे."
 
यावर अदानी समूहाने उत्तर दिलंय की, नऊ लिस्टेड कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे ऑडिट सहा मोठ्या ऑडिटर्सकडून केलं जातं. अदानी टोटल गॅसचं ऑडिटिंग
 
यातल्याच एका ऑडिटरकडे सोपवण्याची योजना आहे.
आय आणि बॅलन्सशीट मध्ये फेरफार?
हिंडेनबर्ग रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय की,  अदानी समूहाच्या काही कंपन्यांमध्ये वास्तविक उत्पन्नापेक्षा जास्तीचं उत्पन्न दाखवण्यात आलंय. आणि बॅलन्सशीट मध्येही फेरफार करण्यात आलाय.
 
 यावर अदानी समूहाने म्हटलंय की, उत्पन्न जास्त दाखवण्याच्या विषयात किंवा कंपन्यांच्या बॅलन्सशीट मध्ये फेरफार करण्याच्या संबंधात सांगायचं झालं तर 9 पैकी 6 सूचीबद्ध कंपन्यांचे उत्पन्न, खर्च आणि विस्तारावरील खर्च हा त्या त्या विशिष्ट क्षेत्राच्या नियामक संस्थेच्या कक्षेत येतो.
 
आणि नियमितपणे याचं पुनरावलोकन केलं जातं.
 
अदानी समूहावरील कर्जाचा बोजा?
रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, प्रमोटर्सने शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतलंय. अदानी समूहावर कर्जाचा मोठा बोजा आहे.
 
यावर अदानी समूहाने म्हटलंय की, शेअर्सवर कर्ज घेण्याच्या विषयात, कर्ज प्रमोटर्स होल्डिंगपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे.
 
गुंतवणूकदार आणि विश्लेषकांनी याआधीच अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांवर असणाऱ्या कर्जाबद्दल चिंता व्यक्त केलीय. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2022 अखेरपर्यंत अदानी समूहाच्या सहा कंपन्या अदानी एंटरप्रायजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनवर 1.88 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं.
 
रिफिनिटीव्ह ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होतंय की, अदानी समूहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे कर्ज त्यांच्या इक्विटीपेक्षा जास्त आहे. अदानी ग्रीन एनर्जीवर तर चक्क इक्विटीपेक्षा 2000 टक्के जास्त कर्ज आहे.
 
रिपोर्ट मध्ये असंही म्हटलंय की, भारतीय शेअर बाजारात एनलिस्टेड असलेल्या अदानी समूहाच्या सात कंपन्यांच्या शेअर्सची किंमत त्याच क्षेत्रातील त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षाही खूप जास्त आहे आणि त्यांची व्हॅल्यू 85 टक्क्यांहून अधिक आहे.
 
हिंडनबर्गच्या रिपोर्ट मध्ये पुढे म्हटलंय की, "जरी आमच्या रिसर्च रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं आणि अदानी समूहाच्या आर्थिक खात्यांचं बारकाईने विश्लेषण केलं तरी त्यांच्या सात लिस्टेड कंपन्यांमध्ये 85% पर्यंत घट होण्याची शक्यता असल्याचं तुम्हाला आढळून येईल. असं होण्यामागचं कारण देखील स्पष्ट आहे, ते म्हणजे शेअर्सचे गगनाला भिडलेलं व्हॅल्यूएशन."
रिपोर्टच्या विश्वसार्हतेवरील दावा
हिंडनबर्गचा दावा आहे की त्यांची रिपोर्ट ही दोन वर्षांच्या संशोधनानंतर तयार झाली आहे. यासाठी अदानी ग्रुपमधील माजी अधिकाऱ्यांसह अन्य अनेक लोकांशी बोलणं झालं आहे आणि अनेक कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे.
 
कंपनीने म्हटलं आहे की त्यांच्याकडे गुंतवणुकीबाबतचा दशकांचा अनुभव आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक फायन्शिएल रिसर्च कंपनी असाच दावा करते. पण या कंपनीकडे असं वेगळं काय आहे?
 
कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिहिलंय की, गुंतवणुकीसाठी जेव्हा ते सल्ला देतात तेव्हा त्याचा आधार हा विश्लेषण असतो त्यासोबतच इनवेस्टिगेटिव्ह ( शोध घेऊन) पद्धतीने केलेले संशोधन, सुत्रांकडून मिळालेली गोपनीय मााहिती या आधारावर देखील संशोधन केलं जातं. अशी तथ्यं शोधून काढणं कठीण असतं. कंपनीच्या नावामागे देखील एक गोष्ट आहे.
 
एका दुर्घटनेवर का आहे आधारित कंपनीचे नाव - हिंडनबर्ग
कंपनीचे नाव हिंडनबर्ग दुर्घटनेवर आधारित आहे.1937 मध्ये हिंडनबर्गच्या घटनेत 35 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
हिंडनबर्ग ही एक जर्मन एअर स्पेसशिप आहे. जी आग लागल्यामुळे उद्ध्व्स्त झाली होती. कंपनीचं म्हणणं आहे की हायड्रोजनच्या फुग्यांमुळे अनेक दुर्घटना झाल्या होत्या. अशात ही दुर्घटना टाळता आली असती.
 
एअरलाइन्सने या स्पेसशिपमध्ये बळजबरी 100 जणांना बसवलं होतं. कंपनीचा दावा आहे की हिंडनबर्ग दुर्घटनेकडून धडा घेऊनच ते शेअर बाजारात सुरू असलेल्या हेराफिरी आणि त्यापाठीमागे चालणाऱ्या गडबड घोटाळ्यांवर लक्ष ठेवतात. अशा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणे आणि ते जगासमोर आणने आमचे उद्देश आहे.
 
हिंडनबर्गचा ट्रॅक रेकॉर्ड
कंपनीच्या वेबसाइटने दावा केलाय की. हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने आपल्या रिपोर्टस आणि इतर कारवायांमुळे शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे मूल्य पाडले आहे.
 
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार हिंडनबर्गने 2020 मध्ये 30 कंपन्यांचे रिसर्च रिपोर्ट सादर केले आणि त्यानंतर त्यांच्या कंपनीचे शेअर्स सरासरी 15 टक्क्यांनी कोसळले.
 
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की पुढील सहा महिन्यांसाठी या कंपन्यांच्या शेअरमध्ये 26 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. अदानी समूहाबद्दलच जर आपण बोललो तर यात हे लक्षात येतं की शेअर बाजाराच्या दोन सत्रातच कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.
 
एका संशोधन संस्थेतील विश्लेषक आसिफ इक्बाल यांचं म्हणणं आहे की स्वतः हिंडनबर्गनेच हे सांगितलं आहे की त्यांच्याकडे अदानी ग्रुपचे शेअर्स हे  शॉर्ट पोजिशनसाठी आहेत. त्यामुळे असं देखील म्हणता येऊ शकतं की हिंडनबर्गच्या रिपोर्ट पाठीमागे एक अजेंडा आहे.
 
आसिफ सांगतात की या रिपोर्टमुळे सरळसरळ हिंडनबर्गला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे ही शंका पूर्णपणे नाकारता येणार नाही की यापाठीमागे त्यांचा काही हेतू आहे. पण रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनीवर कर्जाचा बोजा आहे, कंपनीची किंमत फुगवून सांगण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार याबाबत दीर्घकाळापासून चर्चा करत आहेत.
 
शेअर बाजार विश्लेषक अरुण केजरीवाल हे देखील हिंडनबर्गच्या हेतूवर शंका घेत आहेत. ते म्हणतात, "जे शेअर होल्डर अॅक्टिव्हिस्ट असतात त्यांचा उद्देश पैसे कमवणे हा नसतो. शेअरला शॉर्ट करायचे आणि नंतर विचारायचे की आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. हे तर सरळ सरळ ब्लॅकमेलिंगच आहे. यासाठी नियंत्रक आहेत ना, त्यांना लिहिलं गेलं पाहिजे. हे 88 प्रश्न सेबीला विचारण्यात यायला हवे होते आणि सेबीनेच त्याचे उत्तर द्यायला हवे होते."
 
याआधी देखील झाली आहे चर्चा
फिंच ग्रुपची कंपनी क्रेडिट साइट्सने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की अदानी ग्रुपवर कर्जाचं मोठं ओझं आहे आणि. त्यांनी याला ‘डीपली ओव्हरलीव्हरेज्ड’ अशी संज्ञा वापरली होती. त्यानंतर देखील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली होती.
 
पण अदानी समूहाच्या फायनान्स आणि मॅनेजमेंटशी निगडित अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक महिन्याच्या आत एक सुधारित रिपोर्ट प्रकाशित करण्यात आली होती.
 
त्यात असं म्हटलं गेलं की कर्जाचा बोजा इतका देखील नाही की जो कधी फेडता येणार नाही. समूहाच्या ज्या विस्ताराबाबतच्या योजना आहेत त्यामध्ये गुंतवणूक ही कर्जाच्या माध्यमातून होत नाहीये.
 
अदानी ग्रुपच्या व्यवस्थापनाची बाजू जाणून घेतल्यानंतर क्रेडिट-साइट्सने ज्या दोन कंपन्यांच्या आकडेवारीत सुधारणा जारी केली होती त्यांची नावे अदानी ट्रांसमिशन आणि अदानी पॉवर ही होती. पण या करेक्श्ननंतर देखील त्यांनी आपल्या शिफारसींमध्ये काही बदल केला नव्हता.
 
गौतम अदानींसाठी मोठा धक्का
2022 मध्ये जगातील पहिल्या 10 श्रीमंतांपैकी एकमेव अदानी हे होते की ज्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली होती.
 
2023 मध्ये अदानी हेच पहिल्या दहा श्रीमंतापैंकी आहेत ज्यांची संपत्ती अब्जावधी डॉलरने घटली आहे. अदानी समूहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी दोन कंपन्या या अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही आहेत ज्या काही काळापूर्वीच समुहाने विकत घेतल्या होत्या.
 
ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या ताज्या रॅंकिंगनुसार गौतम अदानी हे चौथ्या क्रमांकावरून घसरून सातव्या स्थानी पोहोचले आहेत.
 
हिंडनबर्ग रिपोर्टला गुंतवणूकदारांनी भ्यायला हवं का?
बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की या रिपोर्टचा प्रभाव अदानी समूहापुरताच मर्यादित दिसला नाही तर पूर्ण शेअर बाजारावर दिसला आहे, लोकांना या प्रश्नांची उत्तरं अदानी समूहाऐवजी सेबीकडून हवी आहेत.
 
शेअर अॅनालिस्ट आसिफ इक्बाल यांचा म्हणणं आहे की या सारख्या रिपोर्टमुळे छोट्या काळातच अधिक नुकसान सहन करावं लागतं.
 
आसिफ म्हणतात, "जर कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असतील तर अदानी समूह या गोष्टींची योग्य उत्तर देऊ शकले तर गुंतवणूकदारांचे नुकसान थांबू शकतं. पण एक गोष्ट नक्की आहे की जितका मोठा हा समूह आहे आणि त्यांच्यावर जो कर्जाचा बोजा आहे त्यामुळे काही बॅंकावर त्याचा. ताण पडणार हे नक्कीच आहे."
 
अरुण केजरीवाल सांगतात, "याच रिपोर्टपुरतं बोलायचं तर या रिपोर्टचा परिणाम अदानी इंटरप्रायजेसच्या एफपीओ पर तर होईलच. कारण कंपनीने हा एफपीओ काही बॅंकांचे कर्ज फेडण्यासाठी आणला आहे तेव्हा, जर त्यात हे अयशस्वी झाले तर अशा स्थिती मोठ्या बॅंका आणि वित्तीय संस्थांवर याचा परिणाम पाहायला मिळेल."
 
एयूएम कॅपिटलच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजेश अग्रवाह यांना वाटतं की रिसर्च रिपोर्टमध्ये असलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. राजेश सांगतात की "असं तर वाटत नाही की हिंडनबर्गने लावलेल्या आरोपांचा परिणाम अदानी समूहावर दीर्घकाळासाठी राहील. परराष्ट्रीय गुंतवणूकदार यामुळे नक्कीच प्रभावित होऊ शकतात पण त्यांच्याकडे स्वतःची रिसर्च टीम असते. या टीमनेच दिलेल्या सल्ल्यांच्या आधारे ते शेअर विकतात किंवा खरेदी करतात. अशा प्रकारच्या रिपोर्टच्या आधारावर निर्णय ते कमीच घेतात."
 
राजेश सांगतात की "शेअर्सच्या किमतीबाबत याआधी देखील प्रश्नचिन्ह उठले आहेत. पण असं केवळ अदानी समूहाच्याच शेअरबाबतीत झालं नाहीये. पण या रिपोर्टमुळे निश्चितपणे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे.  हेच कारण आहे की अदानी समूहाच्या शेअर व्यतिरिक्त बॅंकिंग आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली."
 
अमेरिकन गुंतवणूकदार बिल अॅकमॅन यांनी हिंडनबर्ग रिपोर्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रॉयटर्सला त्यांनी सांगितले की "हिंडनबर्गचा रिपोर्ट अतिशय विश्वासार्ह आहे आणि मोठ्या संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे."
 
त्यांनी इतर गुंतवणूकदारांना देखील इशारा दिलाय की त्यांनी स्वतः अदानी समूहावर संशोधन आणि अभ्यास केलेला नाही तेव्हा त्यांचं विधान हे गुंतवणुकीचा सल्ला म्हणून कुणी घेऊ नये.
 
Published By- Priya Dixit