बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (09:42 IST)

जम्मू-काश्‍मीर कायमचा आमचा – भारत

संयुक्त राष्ट्रे -जम्मू-काश्‍मीर हा आमचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या एका व्यासपीठावर पाकिस्तानचे दात त्या देशाच्याच घशात घातले. भारतीय भूभागाची नापाक अभिलाषा बाळगून असणारा पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्‌द्‌याला परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून वापरत आहे, असेही भारताने परखड शब्दांत सुनावले.
 
काश्‍मीरवर वक्रदृष्टी ठेऊन असणाऱ्या पाकिस्तानकडून नेहमीच कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्या मुद्‌द्‌याचे तुणतुणे वाजवले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता आणि संस्कृतीशी निगडीत फोरममध्ये गुरूवारी चर्चा झाली. या चर्चेत नेहमीच्या सवयीप्रमाणे पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मालीहा लोधी यांनी विनाकारण काश्‍मीर मुद्दा उपस्थित केला. काश्‍मीरमधील जनतेला अजूनही स्वयंनिर्णयाचा मूलमूत अधिकार नाकारला जात असल्याची मुक्ताफळे लोधी यांनी उधळली.
 
पाकिस्तानी स्थायी प्रतिनिधींच्या या कांगाव्याला भारताचे वरिष्ठ दूत श्रीनिवास प्रसाद यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाकिस्तान सर्वपरिचित आहे. तो देश परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून दहशतवादाचा वापर करत आहे. भारतीय भूभागावर वाईट डोळा ठेवत पाकिस्तानने पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर केला. स्वयंनिर्णय आणि न्यायाच्या  चिंतेच्या बुरख्याखाली दडून तो देश मनसुबे रचत आहे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. हे वास्तव पाकिस्ताननेही स्वीकारायला हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.