फी वाढ : जेएनयूत 50 वर्षांत पहिल्यांदाच परीक्षांवर बहिष्कार
वसतिगृहाच्या फी वाढीविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांन आक्रमक पवित्रा घेतलाय. फी वाढीला विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्टर परीक्षांवर बहिष्काराचा निर्णय घेतला. जेएनयूच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षेवरील बहिष्काराची घटना घडली.
45 दिवसांच्या आंदोलनानंतर जेएनयूतील विद्यार्थी संघटना आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांसोबत बैठक झाली. मात्र, त्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षेवरील बहिष्काराचाच निर्णय घेतला.
गुरूवारी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी मात्र संसदेत वसतिगृह फी वाढीच्या निर्णयाचं समर्थन केलं.
दुसरीकडे, वसितगृहाच्या अध्यक्षांसोबत कुलगुरू एम. जगदीश कुमार यांची बैठक झाली. यात वसतिगृहाच्या मुद्द्यासह विद्यापीठातील स्थिती सर्वसामान्य व्हावी या अंगानं चर्चा झाली. मात्र, या चर्चेतूनही काहीच निष्पन्न झालं नाही. विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलाच ठोस प्रस्ताव ठेवला नसल्याचं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे.