बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 एप्रिल 2020 (08:14 IST)

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. मंगळवारी सायंकाळी (दि. २८) राजभवन येथे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली.राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी न्या. दत्ता यांना शपथ दिली. 
 
शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवण्यासह योग्य खबरदारी घेण्यात आली.विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.दिनांक ०९ फेब्रुवारी १९६५ रोजी जन्मलेल्या न्या. दीपांकर दत्ता यांनी दिनांक १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वकिलीला सुरुवात केली. त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण १६ वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली. 
 
घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. दिनांक २२ जून २००६ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा कार्यकाळ २७ एप्रिल २०२० रोजी संपला, या पार्श्वभूमीवर न्या. दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली.