माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेत वर्णी
देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते.
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी १२ जणांच्या नावांची शिफारस केली जाते. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या नावांचा विचार यासाठी राष्ट्रपतींकडून केला जातो. यापैकी एका सदस्याचा कार्यकाळ संपला असल्याने रिक्त झालेल्या जागेवर भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली.