शरद पवारांची टीका भाजपला झोंबली; केंद्रीय मंत्र्याने चक्क भेट नाकारली !
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर नवी दिल्लीत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी पवारांची भेट नाकारली असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि यांची भेट ऐनवेळी नाकारली असल्याची बाब आता समोर आली आहे. पियूष गोयल आणि शरद पवार यांची नियोजित भेट होणार होती. पण, अचानक ही भेट नाकारण्यात आली. भेट का नाकारली या संदर्भात कारण पुढे आलेले नाही.पण, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे तर ही भेट नाकारण्यात आली नाही ना? असे प्रश्न निर्माण झाला आहे.
शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करतो, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, जे घडलं त्याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू होते. शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती उत्तर प्रदेशात निर्माण झाली आहे, अशी जळजळीत टीका पवारांनी केली होती.