मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (09:08 IST)

ललित झा : संसदेतील निदर्शनाचा कथित 'मास्टरमाईंड' नेमका कोण आहे?

Lalit Jha
बुधवारी (13 डिसेंबर) संसदेत चार जणांनी 'रंगीत धूर' सोडत सभागृहात आणि परिसरात घोषणाबाजी केली. ललित झा हा या घटनेचा 'मास्टरमाइंड' असल्याचं बोललं जात आहे.
ललित झा यांनी गुरुवारी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. या प्रकरणातील ही सहावी अटक असून आतापर्यंत एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
बुधवारी लोकसभेत झिरो अवर सुरू असताना व्हिझिटर गॅलरीतील दोन व्यक्तींनी खासदारांच्या चेंबरमध्ये उडी मारली आणि छोट्या डब्यातून पिवळा धूर सोडण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी घोषणाबाजीही केली.
 
हे आंदोलक सभापतींच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असताना खासदारांनी त्यांना मध्येच पकडलं.
 
त्याचवेळी अमोल शिंदे आणि नीलम नावाच्या दोन आंदोलकांनी संसदेबाहेर जवळपास अशाच प्रकारे गोंधळ घातला. त्यांनी पिवळा धूर वातावरणात सोडला आणि ‘हुकूमशाही बंद करा’च्या घोषणा दिल्या.
 
या चौघांनाही पोलिसांनी घटनास्थळीच पकडलं. मात्र या कटाचा 'मास्टरमाईंड' असलेल्या ललित झा याला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
 
NDTV च्या रिपोर्टनुसार, 32 वर्षीय ललित मूळचा बिहारचा आहे. पण तो कोलकात्यात शिक्षक म्हणून काम करतो.
 
ललित झा हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्यापासून प्रेरित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
ललित हा 'नीलाक्ष आईच' नावाच्या एनजीओमध्ये सरचिटणीस आहे.
 
बुधवारी संसदेच्या आवारात आंदोलकांनी पिवळा धूर सोडला तेव्हा ललितने त्याचा व्हीडिओ बनवला आणि तो या एनजीओच्या संस्थापकांना पाठवला. यावेळी त्यानं लिहिलं होतं की, “ते सुरक्षित आहेत.”
 
‘तो शांत स्वभावाचा होता'
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ललित झा याच्या जुन्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, तो कोलकाता येथील बडा बाजार भागात स्थानिक मुलांना शिकवायचा.
 
शेजारी म्हणाले, "झा शांत स्वभावाचा होता आणि स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालत असे. दोन वर्षांपूर्वी त्याने हा परिसर सोडला होता."
 
त्याचा एक शेजारी म्हणाला, “आम्ही त्याला शिक्षक म्हणून ओळखत होतो. तो काही वर्षांपूर्वी या भागात आला होता, तो एकटाच राहत होता आणि लोकांशी क्वचितच बोलत असे.
 
"कधी कधी तो माझ्या दुकानात चहा घ्यायला यायचा. तो खूप लो प्रोफाइल असायचा. एक दिवस अचानक इथून निघून गेला आणि परत आलाच नाही."
 
दुसऱ्या एका शेजाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, ललित झा यांचे वडील त्या भागात वॉचमन म्हणून काम करायचे. ललित हा दोन वर्षांपूर्वी उत्तर 24 परगणा येथील बागुआती येथे गेला होता.
 
आत्मसमर्पण करण्यापूर्वी पुरावे हटवले
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी आत्मसमर्पण करण्यापूर्वी ललितने सर्व तांत्रिक पुरावे नष्ट केले.
 
संसद भवनातून पोलिसांनी चार जणांना अटक केली तेव्हा ललितही तिथे उपस्थित होता. पण तो तिथून पळून गेला.
 
वृत्तपत्रानं पोलिस सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, "रात्री 11.30 च्या सुमारास तो बसनं राजस्थानमधील कुचामन शहरात पोहोचला, जिथं तो त्याचा साथीदार महेशला भेटला."
 
"महेशलाही या उपक्रमात सहभागी व्हायचं होते, पण त्याच्या आईनं त्याला थांबवल्यानं तो यात सामील होऊ शकला नाही. 'भगत सिंग फॅन पेज' नावाच्या फेसबुक ग्रुपद्वारे महेश ललित झा आणि इतरांशी जोडला गेला होता."
 
“महेशनं त्याचा चुलत भाऊ कैलाश याच्यासोबत ललितला एका ढाब्यावर नेलं आणि ढाबा मालकाकडून खोली घेतली. ढाबा मालक महेशला ओळखत होता म्हणून त्यानं यांना खोली दिली.
 
गुरुवारी सकाळी ललितनं या दोघांच्या मदतीनं फोनसह तांत्रिक पुरावे नष्ट केले. यानंतर महेश आणि ललित झा यांनी कैलाशला आपण आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितलं आणि मग ते तिथून निघून गेले."
 
पोलिसांनी कैलाशला त्याच्या फोन नंबरवरून ट्रेस करत गुरुवारी दुपारी ताब्यात घेतलं.
 
कैलाशनं पोलिसांना सांगितलं की, ललित झा आणि महेश ट्रेननं जयपूरला निघाले होते आणि तिथून दिल्लीला जाणारी बस पकडायची होती.
 
यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले, मात्र काही वेळानं त्यांनी कर्तव्य पथ पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केलं.
 
न्यायालयात काय झालं?
या प्रकरणी पोलिसांनी यूएपीएच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.
 
गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टानं आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
 
द हिंदूच्या वृत्तानुसार, आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यापूर्वी कोर्टानं त्यांना एक वकील दिला कारण त्यांच्या बाजूनं कोणीही वकील नव्हता.
 
बातमीनुसार, अटक झाल्यापासून कुटुंबीयांशी बोलणं न झाल्याचं एका आरोपीनं न्यायालयात सांगितलं.
 
अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी एनआयए खटल्यांच्या विशेष न्यायाधीश हरदीपकौर यांना सांगितलं की, हे कृत्य ‘सुनियोजित कटाचा’ भाग होतं. आरोपींचा ‘दहशतवादी संघटनां’शीही संबंध असू शकतो.
 
श्रीवास्तव कोर्टात म्हणाले, “पॅम्प्लेट पाहा, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यात पंतप्रधानांना 'मिसिंग पर्सन' म्हणून दाखवल्याचं चित्र आहे आणि शोधल्यास स्विस बँकेकडून बक्षीस जाहीर केले आहे. या लोकांनी पंतप्रधानांना 'घोषित गुन्हेगार' म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे."
 
या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं आहे?
बुधवारी भारतीय संसदेत निदर्शकांनी घोषणाबाजी केली आणि इमारतीच्या आत-बाहेर पिवळा धूर सोडला तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
 
या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारपर्यंत 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध यूएपीए दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अटक करण्यात आलेल्या काही लोकांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, ते देशातील बेरोजगारी आणि इतर संकटांमुळे त्रस्त होते आणि या विरोधात आंदोलन करत होते.
 
या घटनेच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयानं एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपल्या अहवालात संसदेची सुरक्षा वाढवण्यासाठी आणखी काय व्यवस्था करावी हेही सांगणार आहे.
 
गुरुवारी संसदेत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाब विचारताना गोंधळ घातल्याबद्दल आधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
 
पण एक खासदार एस. आर. पार्थिबन प्रत्यक्षात लोकसभेत उपस्थित नव्हते म्हणून त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
 
आता मणिकम टागोर, कनिमोळी, आर. नरटराजन, वाक सारिकंदन, बेनी बहनान, के सुब्रमण्यम, एस व्यंकटेश आणि मोहम्मद जावेद यांच्यासह एकूण 13 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले.
 
राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
 
लोकसभा सचिवालयानेही सुरक्षेतील या त्रुटींबाबत कारवाई केली आहे.
 
निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे नऊ, सीपीएमचे दोन, डीएमकेचे एक, सीपीआयचे एक आणि टीएमसीचा एक खासदार आहे.
 
आंदोलकांचे नातेवाईक काय म्हणाले?
प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणाऱ्यांपैकी सागर शर्मा हा लखनऊचा रहिवासी आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सागर काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडल्याचं त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे.
 
पोलिसांनी कुटुंबीयांच्या हवाल्यानं सांगितलं की, सागर नुकताच बेंगळुरूहून लखनऊला परतला होता.
 
सागरच्या बहिणीनं सांगितलं की, "माझा भाऊ ई-रिक्षा चालवायचा. पूर्वी तो बेंगळुरूमध्ये काम करायचा."
 
सागरची आई राणी म्हणाली, “दोन दिवसांपूर्वी तो घरातून निघून गेला होता. काही कामासाठी मित्रांसोबत दिल्लीला जात असल्याचं त्यानं सांगितलं होतं.”
प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनोरंजन आहे. तो भाजप खासदार प्रताप सिम्हा यांचा मतदारसंघ असलेल्या म्हैसूर येथील आहेत.
 
प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीवरूनच त्याला पास जारी करण्यात आला होता.
 
बीबीसीचे सहयोगी पत्रकार इम्रान कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, मनोरंजनाचे वडील देवराजू गौडा यांनी त्यांच्या मुलाच्या कृतीचा 'तीव्र निषेध' केला आहे.
 
देवराजू गौडा यांनी पत्रकारांना सांगितलं की, ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या मुलानं अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. हासन जिल्ह्यातील गावात मनोरंजन शेती करत असे.
 
देवराजू गौडा म्हणाले, "त्यानं विवेकानंदांचं खूप वाचन केलं आहे. त्याला फक्त समाजासाठी, वंचितांसाठी चांगलं काम करायचं होतं."
 
"अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर तो कोंबड्या, मेंढ्या आणि मासे पाळत असे. मनोरंजन दिल्लीला जायचा, पण तिथं काय करायचा हे त्यानं कधीच सांगितलं नाही.
 
नीलमची आई सरस्वती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांची मुलगी नोकरी मिळत नसल्यामुळे त्रस्त होती.
 
नीलमचा धाकटा भाऊ म्हणाला, "तिने बीए, एमए, बीएड, एमएड, सीटीईटी, एमफिल आणि नेट उत्तीर्ण केले होते. तिनं बेरोजगारीचा मुद्दा अनेकदा मांडला आहे. शेतकरी आंदोलनातही तिने भाग घेतला होता."
 
नीलमची आई सरस्वती यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, "मला खंत वाटत नाही. नीलमने जे काही केलं ते तिच्या दृष्टीनं तिनं योग्यच केलं. ती बेरोजगार होती, ती भटकत होती. अनेक मुले अशी असतात. जे रोजगाराशिवाय भटकत असतात. तिनं कुणावरही जीवघेणा हल्ला केलेला नाही. तिनं बेरोजगारीमुळे हे पाऊल उचललं आहे."
 
त्यांनी पुढे सांगितले की, "तिला नोकरीची खूप गरज होती आणि आपण कुटुंबावर ओझं आहोत, असं तिला वाटत होतं. तुला नोकरी मिळाली नाही तरी काही फरक पडत नाही. आम्ही तुला ओझं मानत नाही. असं मी माझ्या मुलीला समजावून सांगितलं. बेरोजगारीमुळे ती खूप अस्वस्थ होती. मी मरणार असंही तिनं म्हटलं होतं.
 
"सरकारनं तिला रोजगार द्यावा आणि आम्ही माफी मागू. आमचा कोणाशीही संबंध नाही. या गोष्टीला विनाकारण राजकारणाशी जोडलं जात आहे."
 
संसद भवनाबाहेर नीलमसोबत आंदोलन करताना अटक करण्यात आलेला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
 
बुधवारी पोलिसांच्या अनेक पथकांनी शिंदेच्या गावात जाऊन त्याच्या घराची झडती घेतली.
 
अमोल शिंदे काही वर्षांपूर्वीपर्यंत पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र तो वारंवार परीक्षेत नापास झाल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.
 
आपल्या मुलाबाबत काहीही माहिती नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
 
अमोल आणि त्याच्या कुटुंबाबाबत अधिक माहिती गोळा करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
Published By-Priya Dixit