शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 6 जुलै 2021 (19:38 IST)

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू असणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भात घोषणा केली.
 
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
 
ले. ज. डॉ माधुरी कानिटकर यांचा जन्म जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. बालरोगशास्त्र या विषयात त्या एमडी आहेत.
2017 ते 2019 या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. अध्यापन व संशोधनाचा एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
 
महिला अधिकाऱ्यांची स्थायी नेतृत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात यावी या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या काहीच दिवसानंतर एका मराठी महिलेला देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
 
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमख
माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल ही श्रेणी देण्यात आली आहे. या श्रेणीपर्यंत पोहोचलेल्या त्या देशातील तिसऱ्या महिला ठरल्या आहेत तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या पहिल्या अधिकारी ठरल्या होत्या.
 
लष्कर, नौदल आणि हवाईदल या तिन्ही सैन्यदलात समन्वय साधला जावा आणि केंद्र सरकारला संरक्षणाबाबत योग्य सल्ला मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती केली. जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत.
 
माधुरी कानिटकर यांनी वैद्यकीय पदवीचं शिक्षण आर्म्ड मेडिकल फोर्सेस कॉलेज (AFMC) मधून घेतलं आहे. दिल्लीतील AIIMS मधून त्यांनी बालरोगशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं. त्या बालरोगतज्ज्ञ आहेत.
 
लष्करात विविध पदांवर त्यांनी 37 वर्षं काम केलं आहे. त्या AFMC च्या देशातील पहिल्या महिला डीन ठरल्या होत्या.
त्यांचे पती राजीव हे भारतीय सैन्यातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. या पदापर्यंत पोहोचलेलं कानिटकर दांपत्य देशातलं पहिलं दांपत्य ठरलं आहे.
 
आपल्या नियुक्तीबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. "ही संस्था अत्यंत पारदर्शक, आदरणीय आणि महिलांसाठी सुरक्षित आहे. तिथे महिलांना योग्य संधी मिळते. रोजचं काम अगदी उत्साहाने करावं, कधीही हार मानू नये" असं त्या इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाल्या होत्या.
माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल होतील हे गेल्या वर्षीच जाहीर झालं होतं. मात्र शनिवारी एक जागा रिकामी झाली आणि त्यांना श्रेणी तसेच पदाची बढती देण्यात आली आणि त्या थेट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुख झाल्या.
 
लेफ्टनंट जनरल ही श्रेणी लष्करातील दोन नंबरची सर्वांत मोठी श्रेणी मानली जाते. त्यानंतर जनरल ही श्रेणी असते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे जनरल आहेत.
लष्करात जशी लेफ्टनंट जनरल ही दोन नंबरची श्रेणी असते तशी नौदलात हीच श्रेणी व्हाइस अॅडमिरल आणि हवाई दलात व्हाइस एअर मार्शल या नावांनी ओळखली जाते.
 
देशातील पहिल्या लेफ्टनंट जनरल पुनीता अरोरा या ठरल्या होत्या.
 
त्या पंतप्रधानांच्या वैज्ञानिक आणि तंत्रविषयक समितीच्या सदस्यही आहेत. त्या AFMC च्या पहिल्या महिला अधिष्ठाता होत. दोन वर्षं त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर उधमपूरमध्ये मेजर जनरल मेडिकल या पदावर होत्या.