बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:39 IST)

महाराष्ट्राला मिळाली दुसरी वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा, नागपूर ते बिलासपूर ट्रेनची अशी आहेत वैशिष्ट्ये

vande bharat express
देशातील सर्वाधिक गती आणि आलिशान असलेली वंदे भारत एक्सप्रेस आणखी एका नव्या मार्गावर धावणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ती धावत आहे. त्यानंतर आज महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर दौऱ्यात या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी आणि रेल्वेच्या पायलटशी संवाद साधला. बिलासपूर (छत्तीसगड) ते नागपूर (महाराष्ट्र) या मार्गावरील देशातील सहावी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे.
 
आठवड्यातून ६ दिवस सेवा
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. सुमारे साडेपाच तासात प्रवासाचा एका टप्प्यातच पूर्ण करेल. बिलासपूर-नागपूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, रविवार (११ डिसेंबर) नागपुरात झाले आहे.
ही ट्रेन बिलासपूर येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि सुमारे १२.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ही गाडी नागपूरहून दुपारी २ वाजता सुटेल आणि ७.३५ वाजता बिलासपूरला पोहोचेल. सध्या सुपरफास्ट गाड्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी सुमारे सात तास लागतात, मात्र ही ट्रेन सुमारे साडेपाच तासांत अंतर कापते.
 
हे थांबे असतील
ही ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) द्वारे चालवली जाईल आणि तिचे रायपूर, दुर्ग आणि गोंदिया येथे नियोजित थांबे असतील. २०२३ मध्ये सिकंदराबाद आणि विजयवाडा दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण मध्य रेल्वे (SCR) मधील ही स्वदेशी बनावटीची पहिली अर्ध-हाय-स्पीड रेल्वे असेल आणि दक्षिण भारतातील अशी दुसरी ट्रेन असेल, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई-अहमदाबाद मार्गावर नव्या पिढीतील वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत ७५ वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
 
अशी आहेत वैशिष्ट्ये
सेमी-हाय-स्पीड ट्रेनचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे, GPS-आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनाच्या उद्देशाने ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि आरामदायी आसनांनी सुसज्ज आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर रवाना झाली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor